खेड तालुक्यातील तरुणांकडून प्लाझ्मादान चळवळीला सुरुवात! त्यांच्या अथक प्रयत्नाने २०० हुन अधिक रुग्णांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:00 PM2021-05-05T16:00:47+5:302021-05-05T16:02:09+5:30
रुग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड यांची माहितीही देतात मिळवून
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील तरुणांनी प्लाझा चळवळ सुरू केली असून २०० पेक्षा अधिक रुग्णांना प्लाझ्मा देऊन मदत केली आहे. यातून अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. याबरोबरच ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देणे. रेमडीसीवर इंजेक्शन शासकीय पद्धतीने कसे मिळवता येईल याची माहिती पुरवणे असे काम ही तरुणाई नित्यनियमाने करत आहे. यामुळे तालुक्यात या तरुणांनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्लाझ्मा, रेमडीसीवर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती डोळ्यासमोर बघत असताना खेड तालुक्यातील सामाजिक काम करणारे तरुण एक विचाराने एकत्र आले. त्यांनी प्लाझ्मा दानाची चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला. १७ एप्रिलला निलेश आंधळे, सदाशिव आमराळे, अमर टाटीया, कैलास दुधाळे, बाबासाहेब दिघे व महेंद्र शिंदे यांनी एकत्र येत व्हाट्सअप ग्रुप सुरू केला. या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना प्लाझ्मा दानाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा देण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली. कैलास दुधाळे यांनी राजगुरूनगर शहरात रिक्षा फिरवून ऑडीओ क्लिपद्वारे जनजागृती केली. तसेच फेसबुक व व्हाट्सअपवरही प्लाझ्मा देण्याबद्दल जागृती करण्यात आली. कोरोना या जागतिक माहामारीची दुसरी लाट अतिशय भयानक आहे. यावेळी कोरोना संसर्ग झालेला रुग्ण अगदी कमी वेळात हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडिसीवर इंजेक्शन व प्लाझ्मा देण्याचा सल्ला द्यावा लागत आहे.
या लाटेच्या सुरुवातीला प्लाझ्मा मिळणे अतिशय अवघड झाले होते. अशातच खेड तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे रुग्ण संख्येवर अंकुश ठेवणे प्रशासनाला देखील अशक्य झाले होते. त्यातच डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन मध्ये प्लाझ्मा लिहून दिल्यानंतर त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडायची. रुग्णाचे नातेवाईक अक्षरशः सोशल मीडिया मध्ये प्लाझ्माच्या मागणीची याचना करताना दिसत आहेत. तरी देखील असा कोव्हीड झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा शोधून देखील सापडत नसे. यातूनच ही प्लाझ्मा दानाची चळवळ उभी राहिली. प्लाझ्मा देणारे डोनर शोधणे, त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांशी जोडून देऊन भोसरी, पिंपरी चिंचवड येथील रक्तपेढ्यांमध्ये पाठवून प्लाझ्मा दान करून घेऊन प्रत्येक रुग्णाला प्लाझ्मा मिळवून देणे असे काम केले जात आहे. आजपर्यंत या टीमने २०० पेक्षा अधिक रुग्णाना मदत मिळवून दिली आहे. यातून अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
याबरोबरच ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड यांची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देणे. रेमडीसीवर इंजेक्शन शासकीय पद्धतीने कसे मिळवता येईल याची माहिती पुरवणे असे काम ही टिम नित्यनियमाने करत आहे. दिवसाला या टीमला २५ पेक्षा अधिक फोन येतात त्यावर काम करून त्यांचा प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे काम ही टिम करत आहे.