बाजारातून प्लॅस्टिक पिशव्या हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:54 AM2018-06-22T01:54:10+5:302018-06-22T01:54:10+5:30

प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरासंदर्भात उद्या (शनिवार) पासून कडक अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

Plastic bag exits from the market | बाजारातून प्लॅस्टिक पिशव्या हद्दपार

बाजारातून प्लॅस्टिक पिशव्या हद्दपार

Next

पुणे : प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरासंदर्भात उद्या (शनिवार) पासून कडक अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह ग्राहकांकडे प्लॅस्टिक पिशव्या सापडल्यास पाच हजार रुपये दंड वसुलीचा इशारा महापालिकेकडून देण्यात आल्याने सर्वांनी चांगलाच धसका घेतला आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांबदल्यात व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिकांनी कागदी-कापडी; तसेच सिल्व्हर फॉईलच्या पिशव्यांचा पर्याय निवडल्याचे ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले आहे.
प्लॅस्टिक बंदी लागू करण्यापूर्वी पालिकेकडून शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई केली जात होती. बंदी जाहीर केलेल्या तारखेपासून पुढील तीन महिने प्लॅस्टिक न वापरण्यासंबंधी लोकांमध्ये जनजागृती करून दंडात्मक कारवाई करण्याचे सूतोवाच महापालिकेने केले होते. त्यानुसार पालिकेने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली. या जनजागृतीसाठी देण्यात आलेल्या मुदतीचा कालावधी २३ जून रोजी संपुष्टात येत असल्याने ही प्लॅस्टिक विरोधी कारवाई तीव्र केली जाणार आहे. यामध्ये उत्पादक, विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे; तसेच सर्वसामान्य नागरिक प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.
किराणा माल दुकानदारांनी कागदी पिशव्या, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला आहे. हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या डब्यांमधून देण्यात येणाºया पार्सलची जागा सिल्व्हर फॉईल पिशव्यांनी घेतली आहे. मॉलमध्ये ग्राहकांना कागदी पिशव्या दिल्या जात असून, त्या पिशव्यांवर ८ ते १२ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत; मात्र कागदी पिशव्यांच्या वापराबाबत काही किरकोळ व्यापाºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, या कागदी पिशव्या विकत घेण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहे. तांदूळ, गहू कागदी पिशव्यांमध्ये द्यायचे कसे, असा प्रश्न किराणा माल दुकानदारांना भेडसावत आहे. १ किलो डाळ पिशव्यांमध्ये दिली, तर ती पिशवी फाटत असल्याने नवीनच डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे २ किलोच्या पिशवीमध्ये १ किलोचा माल द्यावा लागणार असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनने प्लॅस्टिक बंदीला विरोध दर्शवून राज्यातील ५० हजार व्यापाºयांनी या विरोधात बंदचा नारा दिला आहे. फेडरेशन आॅफ असोसिएशन इन महाराष्ट्र या संघटनेच्या शिष्टमंडळाची शासनाच्या बुधवारी रात्री तज्ज्ञ समितीसमवेत बैठक झाली. त्यामध्ये फेडरेशनने आपली बाजू मांडली. चर्चेमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा अधिक पिशव्या बंदीमधून वगळण्यात आल्या आहेत. मात्र त्या पिशव्यांवर मॅन्यूफॅक्चररचे नाव, पत्ता आणि पुनर्वापराचे चिन्ह असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
व्यापाºयांकडे असलेल्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २३ जूनची मुदतही वाढविण्यात आली असल्याचे महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी यांनी सांगितले.
>कशावर आहे बंदी?
प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह थर्माकोल, प्लॅस्टिक पासून तयार केलेल्या ताट, कप, वाट्या, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्न पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या वस्तूंचा बंदीमध्ये समावेश आहे.
प्लॅस्टिक पिशव्या बंद झाल्यामुळे गहू, तांदूळ कशात द्यायचे, हा प्रश्न आमच्यापुढे उभा ठाकला आहे. आम्ही कागदी पिशव्यांचा पर्याय निवडला आहे, मात्र त्या पिशव्या विकत घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे. या प्लॅस्टिक बंदीमुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
- महेश चौधरी,
किराणा माल दुकानदार

Web Title: Plastic bag exits from the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.