निर्णय चांगला, पर्यायी व्यवस्था हवी ; प्लॅस्टिक बंदीवर पुणेकरांच्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:53 PM2018-03-19T17:53:50+5:302018-03-19T17:53:50+5:30
गुढीपाडव्यापासून राज्यात टप्याटप्याने प्लस्टिक बंदी करण्यात येणार असल्याची घाेषणा सरकारने केली. या निर्णयाचे पुणेकर नागरिक व विक्रेत्यांनी स्वागत केले असून कापडी पिशव्या वापरण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत अाहे.
पुणे : गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करणार करण्यात अाली. त्याबाबतची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली होती. या बंदीला पुणेकरांनी पाठींबा दिला असून सरकारचा निर्णय योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. तर प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही अनेकांनी व्यक्त केली.
राज्य सरकारकडून प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. या पिशव्यांचा वापर केल्यास पहिल्या वेळेस पाच हजार दुसऱ्यावेळेस दहा तर तिसऱ्या वेळेस एखादी व्यक्ती या पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
सरकारच्या या निर्णयाबद्दल पुणेकर सकारात्मक असून प्लॅस्टिक पिशव्यांवरची बंदी योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु या पिशव्यांच्या व्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था सरकारने करायला हवी तसेच ग्राहकांमध्ये सुद्धा जनजागृती करण्याची मागणी काही भाजी विक्रेत्यांनी केली आहे. भाजी विक्रेते सचीन पडवळ म्हणाले, प्लॅस्टिक पिशव्यांच्या बंदीचा निर्णय योग्य आहे. उलट या निर्णयामुळे आमचाच फायदा आहे. कारण आम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या विकत घेण्याचा भुर्दंड पडणार नाही. परंतु ग्राहकांमध्ये याबाबत जागृती असणे गरजेचे आहे. अनेक ग्राहक अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आग्रह धरतात. असे न करता त्यांनी आपल्या सोबत कापडी पिशवी आणावी.
रेखा खांदवे म्हणाल्या, ज्या ठिकाणी या पिशव्या तयार केल्या जातात त्या कंपन्यांवरच बंदी घालाया हवी. त्या कंपन्या बंद केल्यातर प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळणार नाही. आमच्या सारख्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा सरकारने या पिशव्या तयार करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
मानसी पारेख या गृहिणी म्हणाल्या, सरकारने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करायला हवा. तसेच विक्रेत्यांनी सुद्धा आपल्या सोबत काही कापडी पिशव्या ठेवाव्यात जेणेकरुन ग्राहक त्या विकत घेऊन भाजी किंवा वस्तू खरेदी करु शकतील.