Plastic Ban : महापालिकेचाच फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:59 AM2018-06-24T03:59:55+5:302018-06-24T04:00:03+5:30
प्लॅस्टिकबंदी अमलात आणण्यापूर्वी सरकारने पूर्वतयारीसाठी तब्बल तीन महिने दिले, मात्र तरीही प्रशासनाची आज बंदी अमलात आणण्याच्या पहिल्याच दिवशी भंबेरी उडाली.
पुणे : प्लॅस्टिकबंदी अमलात आणण्यापूर्वी सरकारने पूर्वतयारीसाठी तब्बल तीन महिने दिले, मात्र तरीही प्रशासनाची आज बंदी अमलात आणण्याच्या पहिल्याच दिवशी भंबेरी उडाली. दंडासाठीच्या जुन्या पावत्यांचा आधार घेत शहरात आज ७३ कारवाया करून ३ लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांना दंडातून सूट देत त्यांच्याकडून फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या काढून घेण्यात आल्या. मात्र उद्यापासून त्यांनाही दंड करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
प्लॅस्टिकबंदी अंमलात येऊ नये यासाठी उत्पादकांकडून बरेच जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र त्यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयाने २० जुलैची वेळ दिल्यामुळे बंदी अंमलात येणारच हे शुक्रवारी रात्रीच स्पष्ट झाले. त्याची तयारीच महापालिका प्रशासनाने केली नव्हती असे बंदीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दिसून आले. आरोग्य निरीक्षक व सहायक आरोग्य निरीक्षक अशा १७० जणांची नियुक्ती प्रशासनाने यासाठी केली आहे. त्यांची संपूर्ण शहरासाठी म्हणून १७ पथके तयार करण्यात आली असून, त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
दिवसभरात या पथकांनी शहरात वेगवेगळ्या भागांत एकूण ७३ ठिकाणी कारवाई केली. त्यातून ३ लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांना यातून सूट देण्यात आली, मात्र त्यांच्याजवळच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तसेच अन्य साहित्य जप्त करून घेण्यात आले. असे ८ हजार ७११ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. ७५ किलो थर्माकोलही जप्त करून घेण्यात आले. शनिवारी सकाळपासून ही सर्व पथके त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कार्यरत झाली.
दरम्यान पथकाकडून दंड वसूल करताना दिल्या जात असलेल्या पावतीवरही काही जणांनी आक्षेप घेतले आहेत. ही पावती महापालिका इतर कारवायांमध्ये करते त्याच दंडाची आहे. प्लॅस्टिकबंदीच्या कायद्याचा किंवा पहिल्यांदा, अथवा दुसऱ्यांदा दंड केला जात आहे याचा काहीही उल्लेख त्यावर नाही. न्यायालयाने प्रशासनाला तयारीसाठी म्हणून तब्बल तीन महिन्यांचा अवधी दिला होता. या कालावधीत प्लॅस्टिकबंदीसाठी अमूक कायद्यान्वये दंड असे छापून घेणे सहज शक्य असतानाही प्रशासनाने तसे केलेले नाही. नव्या पावत्या रविवारी सायंकाळी मिळणार असल्याचे काही अधिकाºयांनी याविषयी विचारले असता सांगितले.
दुकानदारांचे आंदोलन; कारवाई मागे
सिंहगड रस्त्यावर एका पथकाने दुकानदारांकडे पॅकिंग करून आलेल्या मालाला प्लॅस्टिक पिशव्या होत्या म्हणून त्यांच्यावर कारवाई सुरू केली. थोड्याच वेळात सर्व दुकानदार एकत्र आले. त्यांनी हा सर्व माल उत्पादकांकडूनच आमच्याकडे आला, अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. पथकातील अधिकारी त्यांचे ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली.
कारवाई रोज सुरू राहणार
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्लॅस्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी आज दिवसभरात करण्यात आली. १७० अधिकाºयांची १७ पथके त्यासाठी स्थापन केली आहेत. महापालिकेने नागरिकांना आज दंड न करता त्यांच्याकडून प्लॅस्टिक फक्त जप्त केले असले तरी उद्यापासून मात्र त्यांच्यावरही दंडाची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई रोज सुरू राहणार आहे.
- सुरेश जगताप, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका