Plastic Ban : सक्षम पर्याय द्या, नंतरच दंडात्मक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:14 AM2018-06-26T07:14:56+5:302018-06-26T07:15:00+5:30
शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरात सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईला विरोध करण्यासाठी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी सोमवारी पालिका भवनासमोर आंदोलन केले.
पुणे : शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरात सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईला विरोध करण्यासाठी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी सोमवारी पालिका भवनासमोर आंदोलन केले. प्रथम प्लॅस्टिकला सक्षम पर्याय उपलब्ध करून द्या, नंतरच दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी व्यापाºयांनी केली. कारवाई सुरू ठेवल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारादेखील दिला.
शासनाने प्लॅस्टिकबंदी करण्यापूर्वी तीन महिने प्लॅस्टिक वापरा बाबत नागरिक, व्यापारी यांच्यामध्ये जनजागृती केली; तसेच आपल्या जवळ असलेले प्लॅस्टिक स्थानिक प्रशासनाकडे गोळा करण्यासाठी व प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील देण्यात आली होती. ही मुदत संपली असून, संपूर्ण राज्यात २३ जून पासून पूर्णपणे प्लॅस्टिकबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे शनिवार (दि.२४) पासून प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत प्लॅस्टिक बाळगणाºयांकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत असून, एवढ्या मोठ्याप्रमाणात दंड आकारण्यास विरोध केला जात आहे.