प्लास्टीक बंदी ! व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवा अन् 501 मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:38 PM2018-07-06T13:38:41+5:302018-07-06T13:40:27+5:30
'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हाट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले.
पुणे (चाकण) : 'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले. प्लास्टीक बंदी निर्णयानंतर परिसरातील गावांनी कठोर निर्णय घेतले आहेत. खराबवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीकडून प्लास्टीकचा वापर टाळणे, महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण देणे व क्रांती महिला बचत गटास स्वस्त धान्य परवानासाठी परवानगी देणे आदी विषय सरपंच जीवन खराबी यांच्या अध्यक्षतेखालील महिलांच्या विशेष सभेत घेण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या ठरावास महिलांनी हात वर करून एकमुखाने मंजुरी दिली. तसेच यापुढे प्लास्टीक वापरणार नसून प्रत्येक महिला आपल्या घरापासून त्याची सुरुवात करेल, असे आश्वासनही दिले. तर महिलांनी आपापल्या वार्डातील समस्याही सभेत मांडल्या. त्यानंतर, सरपंचांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत कर्मचाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या.
खराबवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सभेत सरपंच जीवन खराबी यांनी मनोगत व्यक्त केले. 'आम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा पहिला उपक्रम हाती घेतला. ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करील किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कर्मचारी दिवसभरात जे काम करतील त्याची नोंद ग्रामपंचायत ठेवणार आहे. सफाई कामगारांनी वार्डात साफसफाई करून कचरा उचलल्यानंतर त्या वार्डातील वार्ड सदस्य किंवा जबाबदार व्यक्तीची सही घेण्याचे त्यांना बजावले आहे. तसेच कर्मचाऱ्याने सही न घेतल्यास, कर्मचाऱ्याचा त्या दिवसाचा पगार कपात करण्यात येणार आहे. सफाई कामगार कचरा उचलत नसेल तर नागरिकांनी आपापल्या वार्ड सदस्याकडे तक्रार करावी. अथवा कचऱ्याचे फोटो आमच्या व्हॉट्सअॅपवर पाठवावेत. या कचऱ्याचा फोटो पाठविणाऱ्या महिलेस 501 रुपयांचे रोख बक्षीस ग्रामपंचायतीच्यावतीने दिले जाईल, असे सरपंच खराबी यांनी ग्रामसभेत बोलताना सांगितले. तसेच 'गाव तंटामुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. गावातील तंटे गावातच सोडवू, वेळप्रसंगी तंटा करणाऱ्यांचे पाय धरू, त्यासाठी मी सरपंच म्हणून 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे,'' असेही खराबी यांनी म्हटले. याप्रसंगी गावातील सर्व महिलांच्यावतीने उद्योजक अरुण जांभुळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या शिस्तीच्या बाबतीत कडक भूमिका घेतल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.