मंचरला प्लॅस्टिकचे दुकान आगीत भस्मसात
By admin | Published: April 26, 2017 02:58 AM2017-04-26T02:58:12+5:302017-04-26T02:58:12+5:30
येथील शिवाजी चौकातील सिद्धेश प्लॅस्टिक या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रात्री भीषण आग लागून दुकान जळून खाक झाले. पाच तासांच्या
मंचर : येथील शिवाजी चौकातील सिद्धेश प्लॅस्टिक या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रात्री भीषण आग लागून दुकान जळून खाक झाले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता आग विझविण्यात यश आले. मात्र सकाळी ११ वाजता आग पुन्हा भडकली. स्थानिक तरुण तसेच अग्निशामक बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश आले. या आगीत पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीतून शेजारचे कापड, तसेच इतर दुकाने सुदैवाने वाचली.
मंचर शहराच्या शिवाजी चौकात घोडेगाव रस्त्यावर ओळीने दुकाने आहेत. त्यातील या दुकानात प्लॅस्टिकचे साहित्य विक्रीसाठी तसेच गोदामामध्ये साठवले होते. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. समोरच असलेल्या मशिदीत मुस्लिमबांधव जमले होेते. त्यांनी ही आग सर्वप्रथम पाहिली. तेथील तरुणांनी तातडीने आग विझविण्यासाठी धाव घेतली. आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, आतमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंनी पेट घेतल्याने आगीने उग्र रूप धारण केले. सरपंच दत्ता गांजाळे, तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी आले. राजगुरुनगर व जुन्नर नगरपालिकांचा आगीचा बंब बोलाविण्यात आला. तोपर्यंत स्थानिक टँकरमालक संपत दैने, कैलास गांजाळे, सुनील जोरी, संदीप वाबळे त्यांच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता आग पूर्णपणे विझली गेली.
सकाळी ११ वाजता आग पुन्हा भडकली. प्लॅस्टिकचे साहित्य वितळले असल्याने आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केल्याने आकाशात धुराचे लोट निर्माण झाले होते. क्षणाचाही विलंब न लावता तरुण पुन्हा आग विझविण्यासाठी धावले. काही तरुण धाडसाने आत जात आगीवर पाणी मारत होते. पाण्याचा मारा करून भडकलेली आग विझविण्यात आली. यादरम्यान राजगुरुनगर व जुन्नर नगरपालिकांचे बंब पुन्हा आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आत जाऊन धुमसणारी आग विझविली. त्यानंतर जेसीबी बोलावून हे दुकान मोडून त्यातील जळलेला माल बाहेर काढण्यात आला.
आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल खात्याने केला आहे. आगीत पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांच्या तत्परतेने आग आजूबाजूला पसरली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. शहरातील मंचर-घोडेगाव रस्ता बंद होता. (वार्ताहर)