प्लास्टिक विल्हेवाटीची यंत्रणा सक्षम व्हावी : डॉ. एस. राधाकृष्णन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:41 PM2018-07-04T21:41:37+5:302018-07-04T21:52:43+5:30
प्लास्टीक ही मनुष्य जातीला मिळालेली मोठी देणगी आहे : विज्ञानतज्ज्ञ प्रा. डॉ. एस. राधाकृष्णन
पुणे : प्लास्टीक ही समस्या नसून त्याच्या विल्हेवाटीची यंत्रणा सहज उपलब्ध नसणे ही मूळ समस्या आहे. प्लास्टीक वापराबाबत जागरुकता आणणे गरजेचे असून प्लास्टीकबंदी ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. प्लास्टिक वापराबाबत नागरिकांमध्ये जबाबदारीचे भान वाढवणे आवश्यक आहे. जबाबदारीची जाणीव जागृत करण्यात आपण यशस्वी झाल्यास मानवजातीला प्लास्टीक वरदान ठरू शकते, असे मत विज्ञानतज्ज्ञ प्रा. डॉ. एस. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
एन्व्हार्न्मेन्टल क्लब आॅफ इंडिया, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इंडियन प्लास्टीक इन्स्टिट्यूट, असोसिएशन फॉर प्रमोशन आॅफ प्लास्टीक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. एस. राधाकृष्णन यांना यंदाचा ‘पर्यावरणभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी एन्व्हायरमेंटल क्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष निलेश इनामदार, डी.टी. देवळे, इंडियन प्लास्टीक इन्स्टिट्यूटचे समीर जोशी, असोसिएशन फॉर प्रमोशन आॅफ प्लास्टीकचे अनिल नाईक, नितीन गोरे, गणेश शिरोडे, आमोद घंमडे, राहूल अमृतकर, कविता टकले, उमेश पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अदिती देवधर, नंदकुमार गुरव, शिवाजी गोरे, सत्यजीत भोसले, नितीन गोरे, विशाल सोनकुळ, दोराबजी जहांगीर, सिद्धी पवार, कानुगा अतुल, पंडित अतिवाडकर, नंदकिशोर गांधी आणि डॉ. निलेश अमृतकर अशा विविध संस्था आणि व्यक्तींना पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राधाकृष्णन म्हणाले, ‘सॅटेलाईटपासून खिशातील पेनपर्यंत प्रत्येक ठिकाण प्लास्टीकने व्यापलेले आहे. अशा परिस्थितीत प्लास्टीकबंदीची फसवी समजूत करुन घेता येणार नाही. प्लास्टीक वापरामुळे तरी जंगले वाचत आहेत. प्लास्टीक कच-याचा पुनर्वापर आणि नैसर्गीकरित्या विघटन केले गेले पाहिजे. प्लास्टीक कचरा कलेक्शन सेंटर प्रत्येक वॉर्डात उभे राहणे आवश्यक आहे. कापड किंवा कागद प्लास्टीकला पर्याय होऊ शकत नाही. प्लास्टीक ही मनुष्य जातीला मिळालेली मोठी देणगी आहे.’
यावेळी प्लास्टीकची निर्मिती, त्याचे उपयोग, पुनर्वापरासाठी योग्य संकलन आणि प्रदूषण याविषयी तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी विधी सल्लागार डी.टी. देवळे यांनी पुरस्कार देण्यामागची कल्पना विशद केली. एन्व्हायरमेंटल क्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष निलेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. कविता टकले आणि समीर जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. उमेश पानसे यांनी आभार मानले.