मराठा क्रांती मोर्चाचे व्यासपीठ राजकारणासाठी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:35+5:302021-05-19T04:12:35+5:30
पुणे : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लढाई अद्यापही सुरू आहे. या आरक्षणाला पाठिंबा ...
पुणे : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लढाई अद्यापही सुरू आहे. या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी काही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना झेंड्यांसह सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राजकारणासाठी मराठा क्रांती मोर्चा व्यासपीठ नाही. त्यामुळे पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असा इशारा मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सचिन आडेकर यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणावर सकल मराठा समाजाने एकत्र येऊन महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे शांततेने काढून जगाला समाजाची ताकद दाखवून दिली. मराठा समाजाच्या सर्व संघटना क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकसंध होऊन राज्य सरकारच्या विरोधात लढत असल्याचे आडेकर यांनी सांगितले.
मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. या लढाईत आम्ही त्यांचे स्वागतच करू, पण कोणी राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन येणार असेल तर त्याला मराठा सेवा संघ विरोध करेल. मराठा क्रांती मोर्चा आणि आरक्षण यात कोणीही पक्ष आणि झेंडा आणू नये, असे आडेकर म्हणाले.