पालेभाज्यांचे भाव तेजीतच

By admin | Published: June 4, 2017 05:33 AM2017-06-04T05:33:03+5:302017-06-04T05:33:03+5:30

शेतकरी संपाचे सावट शनिवारी शहरावर अधिक गडद झाल्याचे दिसून आले. संपाची तीव्रता कायम असून भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव तेजीच राहिले.

Platinum Quality | पालेभाज्यांचे भाव तेजीतच

पालेभाज्यांचे भाव तेजीतच

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शेतकरी संपाचे सावट शनिवारी शहरावर अधिक गडद झाल्याचे दिसून आले. संपाची तीव्रता कायम असून भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव तेजीच राहिले. संप मिटल्याबाबत संभ्रमावस्था असल्याने रविवारीही बाजारात आवक कमीच होण्याची शक्यता असल्याने गगनाला भिडलेले भाज्यांचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशीही शहरात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असुन सर्व भाज्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह खानावळी, हॉटेल चालकांना संपाचा चांगलाच फटका बसला आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारातून अनेक किरकोळ विक्रेते, खानावळ, हॉटेल चालक भाजीपाला खरेदी करतात. मात्र, शनिवारी बाजार बंद असल्याने भाज्यांसाठी सर्वांचीच धावपळ उडाली.
शहराच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने चढ्या भावाने भाज्यांची खरेदी करावी लागली. माल न मिळाल्याने काही विक्रेत्यांना भाज्यांची विक्री करता आली नाही. त्यामुळे ग्राहकांचीही तारांबळ उडाली.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
काही शेतकरी संघटनांनी शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी अनेक भागात शेतकऱ्यांनी संपात सहभाग कायम असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शनिवारी मार्केटयार्डातील अनेक व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी संपर्क साधून बाजार सुरू असल्याबाबत खातरजमा केली. शेतकऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीवर बाजारात माल आणावा, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ज्येष्ठ आडते विलास भुजबळ म्हणाले, मार्केटयार्डात पुणे जिल्ह्याशिवाय विविध भागात भाजीपाल्याची आवक होते. या भागातील शेतकऱ्यांनी संपर्क साधून बाजाराच्या स्थितीची माहिती घेतली. काही भागातील शेतकऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे रविवारीही बाजारात आवक कमी होण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत होणारी आवक कमी असल्याने भाव तेजीच राहतील.

दूध पुरवठा विस्कळीत
शेतकरी आंदोलनामुळे शनिवारी शहरातील पिशवीबंद दूधाचा पुरवठा विस्कळीत झाला. शहरात दररोज येणाऱ्या सुमारे १५ लाख लिटरपैकी ६० ते ६५ टक्के वाटा पिशवीबंद दूधाचा असल्याने दूधटंचाईची तीव्रता जाणवली. दूध टंचाईमुळे गणेशपेठ दूधभट्टीत एका लिटरला तब्बल ७४ रुपये भाव मिळाला.
शहरात नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील विविध भागातून दूधाचा पुरवठा
होतो. शहर हद्दीलगतच्या गावांतून घरोघरी
दूधवाटप करणाऱ्या गवळ््यांचा वाटा देखील जवळपास ३५ टक्के इतका आहे. त्यांच्याकडून दूधपुरवठा झाल्याने दूध आणीबाणी टळली. शहरातील मध्यवस्तीत दूध पुरवठा करणाऱ्या गणेशपेठ दूधभट्टीत केवळ २ ते अडीच हजार लिटर दूधाची आवक झाल्याने, दूधाला लिटरमागे ७४ रुपयांचा भाव मिळाला. दूधाला प्रथमच इतका भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
या विषयी माहिती देताना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, शेतकरी आंदोलनामुळे येथील दूधाची आवक २ लाख २५ हजार लिटरवरुन १ लाख २५ हजार लिटर पर्यंत खाली घसरली. आंदोलन सुरु असेपर्यंत अधिकाधिक दूध वितरणावर भर देण्यात येईल.
गणेशपेठ दूध-खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे म्हणाले, येथील दूध संकलन ८ हजार लिटरवरुन अडीच हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. दूध टंचाईमुळे १८ लिटर्सच्या घागरीस १ हजार ३२० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. एका लिटरला ७४ रुपयांचा भाव मिळाला. ईद, राखी पोर्णिमा आणि दसऱ्याला दूधाला अधिक मागणी असते. गेल्यावर्षी १८ लिटरच्या घागरीस १ हजार २०० रुपयांचा (एका लिटरला ६७ रुपये) भाव मिळाला होता.


शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास चार लाख लिटर दूधाची आवक थंडावली होती. त्यामुळे शनिवारी वितरणावर त्याचा परिणाम झाला. काही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर दूधाचे टँकर बोलाविले आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत स्थिती सुरळीत होणे अपेक्षित आहे.
- श्रीकृष्ण चितळे,
दूध आणि मिठाई विक्रेते

Web Title: Platinum Quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.