नाटकाचे ‘पालकत्व’ घ्यावे
By admin | Published: February 5, 2016 02:21 AM2016-02-05T02:21:31+5:302016-02-05T02:21:31+5:30
महाराष्ट्रामध्ये बोलीभाषांमध्ये नाटक होण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी बोलीभाषेमध्येच नाटके लिहून घेऊन त्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात आणि त्यातील विजेत्या नाटकाचे खासदाराने
पुणे : महाराष्ट्रामध्ये बोलीभाषांमध्ये नाटक होण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी बोलीभाषेमध्येच नाटके लिहून घेऊन त्याच्या स्पर्धा आयोजित कराव्यात आणि त्यातील विजेत्या नाटकाचे खासदाराने पालकत्व घेऊन त्याचे राज्यभर दौरे करावेत, अशी अपेक्षा नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा, रोटरी क्लब आॅफ पुणे रॉयल आणि निळू फुले कला अकादमीच्या वतीने ठाणे येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा ज्येष्ठ अभिनेते आणि माजी संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
व्यावसायिक, प्रायोगिक आणि बालरंगभूमी असलेल्या त्रुटींची माहिती देणे आणि तालमीसाठी शाळांचे हॉल उपलब्ध करून देणे, सामानासाठी अथवा नाट्य संस्थेच्या वाहनांसाठी उड्डाणपुलाच्या खालची जागा वापरण्यास परवानगी देणे यासंबंधीची विनंती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार आहे.
सत्काराला उत्तर देताना कधीही शाळेची पायरी न चढलेला एक मुलगा अध्यक्षपदापर्यंत जाऊन पोहोचला, ही केवळ रसिकांची पुण्याई आहे. सज्जनांच्या घरी जाऊन जी माधुकरी मागितली तेच माझे यश आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘नाटक आणि कीर्तन ही सांस्कृतिक भूक आहे, एकदा तोंडाला रंग लागला की तो लावावाच लागतो, ती एक ऊर्मी आहे, नाटक हे व्यसन आहे, ते कधीही सुटणार नाही, नाटकांना चांगले दिवस नक्कीच येतील.
ज्येष्ठ रंगकर्मी मधुवंती दांडेकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, रोटरीचे जयंत रजपूत, वर्षा जोगळेकर, मेघराज राजेभोसले उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर ‘कलाकार तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत मधुवंती दांडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. (प्रतिनिधी)