Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 05:02 PM2024-07-31T17:02:38+5:302024-07-31T17:05:42+5:30

अनेक मुलं पैसे लावून हे खेळ खेळत असून, त्यातील आव्हानात्मक टास्क पूर्ण करण्याच्या नादात सुंदर आयुष्य गमावून बसत आहेत

Play in the online game Think about it isn't your child also stuck in this maze? | Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना?

Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना?

नम्रता फडणीस 

पुणे : पबजी किंवा ब्ल्यू व्हेल चॅलेंज सारख्या गेमवर देशभरात निर्बंध घातलेले असतानाही वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून हे गेम्स मुलांच्या हातात पडत आहेत. अनेक मुलं पैसे लावून हे खेळ खेळत असून, त्यातील आव्हानात्मक टास्क पूर्ण करण्याच्या नादात सुंदर आयुष्य गमावून बसत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात साेमवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ऑनलाइन गेम्सच्या नादात मुले जीवनाचा खेळ खल्लास करत असल्याचे समाेर आले आहे. पालकांनाे, वेळीच धाेका ओळखा अन् सावध व्हा! असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

चोरवाटेने म्हणजे व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामसारख्या ॲपवर लिंक पोस्ट करून मुलांना या गेम्समध्ये अडकवले जात आहे. यात १६ ते १८ वयोगटांतील मुले माईन्स, स्टेक्स, हमसफर कॉम्बॅट आणि टॉम क्लिकर यांसारखे ऑनलाइन गेम्स पैसे लावून खेळत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोनच दिवसांपूर्वी ब्लू व्हेल चॅलेंज या ऑनलाइन गेमच्या नादात पिंपरी चिंचवडमधील १६ वर्षीय मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करत जीवन संपविल्याने खळबळ माजली आहे.

अल्पवयीन मुलांना ऑनलाइन गेम्सचे लागलेले व्यसन हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. नकळत्या वयात मुलांच्या हातात मोबाईल मिळणे, यासह इतर गॅजेट्स उपलब्ध करून दिले असले तरी त्याचा वापर कसा करायचा? हेच मुलांना माहिती नाही. एखादी गोष्ट उत्साहाच्या भरात करून बघायची या अट्टाहासातून मुलांच्या हातून नको त्या गोष्टी घडत आहेत. केवळ एका गेम्सपायी जीवन संपविण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचत आहे. त्यात दोष कुणाचा? पालकांचा, मुलांचा, सरकारचा की असे गेम्स उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

मुलांना हे गेम्स मिळतातच कसे?

माईन्स, स्टेक्स हे दोन गेम्स गुगलच्या संकेतस्थळावर सहजपणे उपलब्ध आहेत, तर हमसफर कॉम्बॅक्ट आणि टॉम क्लिकर यांसारखे गेम टेलिग्रामसारख्या सोशल मीडियावर पाठविल्या जातात. हे गेम्स खेळण्यास मुलांना मनाई आहे, तरीही मुलांच्या मोबाईलमध्ये पेटीएम किंवा गुगल पेसारखी ऑनलाइन शुल्क भरणारी ॲप असल्याने मुले १० रुपयांपासून ते कितीही रुपयापर्यंत पैसे लावून गेम्स खेळण्याची शक्यता असते. माझे मित्र हा गेम्स खेळतात. फक्त यात कोणतीही टास्क दिली जात नसल्याचे प्रतीक (नाव बदललेले) याने सांगितले.

हेच नाव का?

- 'ब्लू व्हेल' हा एक मासा आहे. ती स्वतः पाण्यापासून स्वतःला दूर करते आणि स्वेच्छेने मरून जाते म्हणूनच या गेमचा शेवट देखील असाच आहे. या गेममध्ये स्वेच्छेने मरण स्वीकारले जाते. त्यामुळे या गेमचे हे नाव ठेवण्यात आले आहे.

घटना १

- पेरणेफाटा (ता. हवेली) येथील महाविद्यालयीन तरुणाने १९ जुलै २०१९ मध्ये मोबाईल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती. वाघोली येथील महाविद्यालयात तो कॉमर्सच्या दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. दिवाकर ऊर्फ संतोष धनपाल माळी (वय १९) असे आत्महत्या केलेल्या या मुलाचे नाव आहे.

घटना २

- पबजी या मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या १६ वर्षीय मुलाने ३ डिसेंबर २०१९ मध्ये आत्महत्या केली होती. मुलगा आजीसमवेत राहात होता. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली होती.

मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेतल्यावर मुले आदळआपट करतात, चिडतात. मग पालकही त्याची वागणूक पाहून पुन्हा त्याला मोबाईल परत करतात. याचा अर्थ मुले पालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. आई-वडिलांचा मुलांवरील धाक कमी होणे हा त्यातला दुर्दैवी भाग आहे. मात्र, आजच्या काळात अशा ऑनलाइन गेम्सवर बंदी घालणे शक्य आहे का? मुळातच आपण सरकारकडे सातत्याने बोट दाखविणार आहोत का? सरकार तुमच्या घरी येऊन मुलाला समजावून सांगणार आहे का? जर आजी-आजोबा टीव्हीला चिकटून पडलेले आहेत, आई-वडील मोबाईलवर चोवीस तास आहेत, तर मग मुले काय शिकणार? मुलांचा स्क्रीन टाइम टप्प्याटप्याने कमी करणे, विशिष्ट वेळ मोबाईल फ्री करणे ते सर्वांनी पाळणे हे पालकच करू शकतात. मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी ही पालकांचीच आहे. - डॉ. भूषण शुक्ला, बाल मानसोपचार तज्ज्ञ

मुलगा अभ्यास करीत नाही, सारखा मोबाईलला चिकटलेला असतो. मोबाईल काढून घेतल्यावर आक्रस्ताळेपणा, चिडचिड करतो अशा आमच्याकडे इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंतच्या मुलांच्या तक्रारी पालकांकडून येतात. मुलांच्या हातात मोबाईल असण्याचे कारण म्हणजे आपल्याकडे मैदाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील ऊर्जेचा वापरच होत नाही. त्यावेळी आम्ही पालक आणि मुलांचे समुपदेशन करून स्क्रीन टाईम कमी करण्याबाबत मार्गदर्शन करतो. - करुणा मोरे, समुपदेशक

Web Title: Play in the online game Think about it isn't your child also stuck in this maze?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.