चार प्रेक्षकांसाठीचं नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:08 PM2018-05-28T19:08:37+5:302018-05-28T19:17:15+5:30
पुण्यातील तरुण थिअटर फ्लेमिंगाे हा अागळा वेगळा नाट्यप्रकार सादर करत अाहेत. एका बंगल्यात सादर हाेणाऱ्या नाटकात केवळ चार ते सहाच प्रेक्षक एकावेळी नाटक पाहू शकतात.
पुणे : तुम्ही एखादं नाटक पाहायला गेलात अाणि तेथे स्टेज नसेल, तुम्हाला बसायला खुर्ची नसेल तुमच्या साेबत फक्त तीनच लाेक नाटक बघायला अाले असतील तर...तुम्ही म्हणाल असं कुठे नाटक असतं का...? तर याचं उत्तर अाहे हाे...पुण्यातील एका बंगल्यात एकावेळी केवळ चार प्रेक्षकांसाठी नाटक सादर केले जाते. नेहमीचा नाटकाचा थिअटरचा परीघ माेडून कुठल्याही ठिकाणी नाटक सादर केलं जाऊ शकतं, तसेच त्या नाटकात प्रेक्षकांनाही सामावून घेतलं जाऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न यातून केला जात अाहे. या प्रकारे नाटक सादर करण्याच्या माध्यमाला थिअटर फ्लेमिंगाे असे म्हंटले जात असून हे माध्यम जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पाेहचविण्यासाठी पुण्यातील तरुण सध्या प्रयत्न करीत अाहेत.
पुण्यातील विनय काेरवणकर व त्याचे मित्र थिअटर फ्लेमिंगाे हा नाट्यप्रकार प्रेक्षकांसाठी घेऊन अाले अाहेत. ललित कला केंद्रातून शिक्षण घेतलेल्या विनय काेरवणकर याला वेगळं नाटक करायचं हाेतं. थिअटरचं प्राेसिनियम ताेडून बाहेर नाटक त्याला करुन पाहायचं हाेतं. सुरुवातीला त्याने अाेझं हे एकपात्री नाटक घराेघरी सादर केलं. त्यानंतर थिअटर फ्लेमिंगाे या नाट्यप्रकारात नाटक सादर करण्याचा त्याने विचार केला. या नाट्यप्रकाराच्या माध्यमातून अाता ताे एका बंगल्यात केवळ चार प्रेक्षकांसाठी रिड मी 5 डी झाेन हे नाटक सादर करत अाहे. 5 डी ही या नाटकाची संकल्पना अाहे. हे नाटक एका बंगल्याच्या विविध भागात सादर केलं जातं. यात प्रेक्षकांना बसण्याची अशी कुठलिही व्यवस्था नाही. नाटकातील पात्र बंगल्याच्या विविध भागांमध्ये नाटक सादर करतात. प्रेक्षक जसजसे बंगल्याच्या विविध ठिकाणी जातात त्याप्रमाणे नाटक पुढे सरकते. या माध्यमातून प्रेक्षकही त्या पात्रांशी एकरुप हाेताे अाणि एक वास्तववादी अनुभव प्रेक्षकांना यातून मिळताे. यात फक्त प्रेक्षक कलाकाराशी बाेलू शकणार नाहीत किंवा त्यांना हातही लावू शकणार नाहीत. एकवेगळा अनुभव यातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला जात अाहे.
एेंशी मिनिटाच्या या नाटकात गे, बायसेक्श्यूल या मुद्दांवर प्रकाश टाकण्यात अाला अाहे. याबाबत बाेलताना या नाटकातील कलाकार अक्षयकुमार मांडे म्हणाला, प्रेक्षकांची संख्या वाढली तर या नाटकाचा प्रेक्षकांवरचा परीणाम कमी हाेऊ शकताे, सध्या ज्या बंगल्यात अाम्ही हे नाटक सादर करताे त्याचा विचार करता केवळ चार ते सहा प्रेक्षकांनाच एकावेळी हे नाटक पाहता येऊ शकते. परंतु पुढे हा अाकडा वाढविण्याचा अामचा विचार अाहे. नाट्यगृहात सादर केलं जाणारं नाटक अाणि या माध्यमात सादर केलं जाणारं नाटक यात फरक अाहे. येथे कलाकारांना वास्तववादी अभिनय करावा लागताे. प्रेक्षक हेही अामच्यासाठी एक नाटकातील पात्रच असतात. एक अभिनेता म्हणून मला खूप वेगळा अनुभव या पद्धतीचं नाटक करताना येत अाहे. प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रीया सध्या अाम्हाला मिळत अाहेत.