माळशेज परिसरात गुलाबी थंडीची आल्हाददायक चाहूल, कमाल तापमानात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:09 PM2023-10-30T14:09:18+5:302023-10-30T14:09:52+5:30
दा पाऊस कमी झाल्यामुळे थंडी जास्त पडणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे....
ओतूर : यंदा मान्सून जाताच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवणार तोच अचानक वातावरणात बदल झाला आणि नागरिकांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा मिळाला. ऑक्टोबर हीटचा चटका कमी झाल्यामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली असून थंडीची आल्हाददायक चाहूल लागली आहे. दिवसा ऊन तर पहाटे आणि रात्री थंडी, असे संमिश्र वातावरण माळशेज परिसरातील गावागावांत तयार झाले आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे थंडी जास्त पडणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तापमानात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने मागील पाच ते सहा दिवसांपासून गारवा जाणवू लागला आहे. थंडीला सुरुवात झाल्यानंतर लगेच माळशेज परिसरात उबदार कपड्यांची दुकाने थाटलेली पाहायला मिळत आहेत. वाढत्या थंडीमुळे आजारांमध्ये वाढ होत आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी ओतूर बाजारपेठेत गर्दी होत आहे. परतीचा पाऊसही यंदा लांबला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपासून थंडीत वाढ झाली आहे.
दरवर्षी पावसाळा संपला की ऑक्टोबर महिन्यातील उष्ण तापमानामुळे नागरिक त्रस्त राहत होते. ऑक्टोबरमध्येच उन्हाळ्याचा अनुभव नागरिकांना येत होता. मात्र यंदा ऑक्टोबर हीटपासून दिलासा मिळाला आहे. अचानक तापमानात घट होत असून उबदार कपडे बाहेर काढल्याचे दिसू लागले. थंडी कडाक्याची नसली तरीही आता सगळीकडेच थंडी पडू लागली आहे. त्यामुळे थंडीमध्ये होणारे त्रासही हळूहळू डोके वर काढू लागले आहेत. सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे तर थंडीमुळे आरोग्याची उपासना करणाऱ्या नागरिकांमध्येही उत्साह असून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक जण व्यायामावर भर देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. माळशेज परिसरात सकाळच्या सुमारास काही भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात धुकेही दिसत आहे.