पावसाच्या पुनरागमनाचा हवामान विभागाचा सुखद संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:39+5:302021-07-07T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेले जवळपास १५ दिवस राज्यात पावसाने ओढ दिली असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेले जवळपास १५ दिवस राज्यात पावसाने ओढ दिली असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाने एक सुखद संदेश दिला आहे. राज्यात कोकणात पावसाला सुरुवात झाली असून येत्या १० जुलैपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात १९ जूननंतर पावसाने ओढ दिली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असला तरी त्याचा सर्वत्र जोर नव्हता.
गेल्या १४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. देवगड ११०, हर्णे, मार्मागोवा, रत्नागिरी ३०, दाभोलिम, माणगाव, पणजी २० मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नांदगाव ३०, अक्कलकोट, बार्शी, सोलापूर २०, पुणे १० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात मानवत, पाथरी, शिरुर अनंतपाल ५०, आंबेजोगाई, लातूर ४०, केज, सोनपेठ ३०, आष्टी, भूम, धारुर, उस्मानाबाद, परभणी २० मिमी पाऊस झाला. विदर्भात भामरागड ३०, अहिरी, साकोली २०, एटापल्ली कुरखेडा, लाखनी, सडक अर्जुनी, सालेकसा, सिरोंचा १० मिमी पाऊस झाला. घाटमाथ्यावरील दावडी १०, ताम्हिणी ३० मिमी पावसाची नोंद झाली होती.
मंगळवारी दिवसभरात मुंबई १५, सांताक्रूझ १८, अलिबाग ७, सातारा १२, नागपूर २१, वर्धा ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात ८ ते १० जुलै, रायगडमध्ये ९ व १० जुलै तसेच पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात १० जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ७ व ८ जुलै रोजी वादळी वारे, विजांचा कडकडाटाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच जालना, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात ९ व १० जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील घाट परिसरात १० जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे.