Aditya Thackeray: कृपया याचे फोटो काढू नका, आदित्य ठाकरेंची ती कृती सर्वांनाच भावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 14:16 IST2022-10-28T14:15:50+5:302022-10-28T14:16:07+5:30
वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

Aditya Thackeray: कृपया याचे फोटो काढू नका, आदित्य ठाकरेंची ती कृती सर्वांनाच भावली
पुणे- राज्यभरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात राज्य सरकार संवेदनहीन असल्याचा आरोप माजी पर्यटन मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर, वडगाव आनंद ता जुन्नर येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांचे कुटुंबीयांचीही गुरूवार (दि 27) रोजी त्यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आदित्य यांची छोटीसी कृती मोठा संदेश देऊन गेली अन् सर्वांना भावली.
वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती. गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी यावेळेस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर हे नेते सोबत होते.
आदित्य यांनी केदारी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, भाऊबीजेच्यादिवशीच ते घरी आल्याने कुटुंबातील महिला भगिंनींनी त्यांना ओवाळले. यावेळी, आदित्य यांनी ओवाळणी स्वरुपात काही भेट दिला. त्यावेळी उपस्थितांना फोटो न काढण्याची विनंती केली. आदित्य यांचा हा संवेदनशीलपणा पाहून सर्वांनाच मनस्वी समाधान वाटले. आदित्य ठाकरे यांनी, 'कुटुंबीयांना भविष्यात शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मदत केली जाईल. आणखी कुठल्या स्वरूपाची मदत लागल्यास अवश्य केली जाणार आहे' असे सांगितले.
कृषीमंत्री कुठेही दिसत नाहीत
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्याचे कृषिमंत्री कुठेही दिसत नसल्याचे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत सरकारी यंत्रणा कुठेही पोहोचलेली नाही. तसेच घटनाबाह्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी दिसत नाही. शेतकऱ्यांना अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. हे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मदतीसाठी आमच्या हातात काही नसले तरी विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांसोबत आम्ही असल्याचे ते म्हणाले. आपण सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी असे ते म्हणाले.