एसटीच्या तक्रारींचा वाचला पाढा
By Admin | Published: January 23, 2016 02:33 AM2016-01-23T02:33:17+5:302016-01-23T02:33:17+5:30
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैैठकीत सदस्यांनी जिल्ह्यातील एसटी महामंडळाविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ग्रामीण भागात बस नाहीत, थांबा नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या.
पुणे : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैैठकीत सदस्यांनी जिल्ह्यातील एसटी महामंडळाविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ग्रामीण भागात बस नाहीत, थांबा नाही, अशा अनेक तक्रारी त्यांनी केल्या.
सदस्यांच्या मागणीनुसार स्थायी समितीच्या बैैठकीला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी सदस्यांनी आपापल्या भागातील मागण्या केल्या.
राष्ट्रवादीचे गटनेते शांताराम इंगवले यांनी दोन महिने पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याचे सांगत मुळशीतील दासवे येथे सकाळी येणारी एसटी तेथून न वळवता ती दोन किलोमीटर असलेल्या बोहिणी गावापर्यंत न्यावी, अशी मागणी केली. बोहिणी गावातील सकाळी शाळेसाठी दासवेला येणाऱ्या १५ ते २0 विद्यार्थ्यांना पायी यावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर बोहिणीला किमान सकाळची फेरी तरी मारावी, अशी मागणी केली.
जुन्नरच्या शिवसेनेच्या सदस्या आशा बुचके यांनी, पुणे- नाशिक एसटी बस नारायणगावला थांबा घेत नाही, त्यामुळे येथून पुढे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. तिला थांबा द्यावा तसेच आळंदी ते जुन्नर एसटी बस नव्याने सुरू करावी तसेच तांबे-पाडळी एसटी बसची मागणी केली.
शिरूरचे सदस्य दादासाहेब कोळपे यांनी, नगरला जाणाऱ्या बस शिरूर स्थानकात थांबत नाहीत, त्या महामार्गावरूनच जातात. हा प्रश्न आम्ही गेली अनेक वर्षे मांडत आहोत, मात्र महामंडळ याची दखल घेत नाही, अशी तक्रार केली.
या वेळी उपस्थित एसटीचे अधिकारी दत्तात्रय जोशी यांनी, येथे केलेल्या मागण्या व तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून दखल घेऊ, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)