समविचारी पक्षांनी एकत्र येेणे आनंदाची गोष्ट; ‘एमआयएम’ बाबत खासदार सुळे यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:23 PM2022-03-19T15:23:37+5:302022-03-19T15:31:28+5:30
'...त्यांच्याकडे काही मुद्दे नसल्याचे सिध्द.ट
बारामती : राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचे असल्यास समविचारी पक्ष सगळ्यांनी एकत्र येणं आनंदाची गोष्ट आहे. विकासकामांसाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचे चांगले होणार असेल तर कुणासाठीही, कुठल्याही राज्यासाठी ही चांगली गोष्ट असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी व्यक्त केले.
एमआयएम चे खासदार इम्तीयाज जलील (mim imtiaz jalil) यांनी महाविकास आघाडीमध्ये ‘एमआयएम’ ला सहभागी करुन घेण्याबाबत आघाडीच्या नेत्यांना आवाहन केले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी देखील एमआयएम बाबत मत व्यक्त केले आहे.
शिवसेनेच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर नक्की काय झालं आहे, याबाबत फारशी माहिती नाही. सगळा विषय समजून घेतल्यावर बोलणे संयुक्तिक ठरेल, अशी सावध प्रतिक्रीया खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. पुणे शहरातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाला खूप विरोध होत आहे. मागील आठवड्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह आणि त्यांची सगळी टीम ‘पवारसाहेबां’ना भेटली. पुण्यामध्ये जर हा उपक्रम केला तर भविष्यात अडचणी येतील, असे राजेंद्र सिंह यांना वाटते. त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचे सुळे म्हणाल्या.
देशामध्ये जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा त्याची चौकशी होते. त्यामुळे इथे सातत्याने गोपनीय माहिती बाहेर पडते. तेव्हा आर्थतच त्याची चौकशी झाली पाहिजे. इडी, सीबीआय या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत ,त्यांची माहिती अशी बाहेर येत असेल तर ही बाब देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेची आहे. ही बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.
...त्यांच्याकडे काही मुद्दे नसल्याचे सिध्द
देशामध्ये ८ वर्ष सरकार यांचं आहे. अनेक राज्यांमध्ये देखील त्यांच सरकार आहे. ज्यांना काम करायचं असतं, त्यांच्या साठी ८ वर्ष हा मोठा कालावधी आहे. मात्र, जर सातत्याने नेहरू यांचा उल्लेख होत असेल तर यांच्याकडे काही मुद्दे नसल्याचे सिध्द होते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.