गळके छप्पर, भिंतींना भेगा अन् अस्वच्छता, शासकिय कर्मचाºयांच्या वसाहतिची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:01 AM2017-09-11T04:01:34+5:302017-09-11T04:01:54+5:30
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) शहरातील शासकीय वसाहतींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने गळके छप्पर, फुटलेली ड्रेनेज लाईन, भिंतींना पडलेल्या भेगा, अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरणातच शासकीय कर्मचाऱ्यांना राहावे लागले आहे.
पुणे - राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) शहरातील शासकीय वसाहतींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने गळके छप्पर, फुटलेली ड्रेनेज लाईन, भिंतींना पडलेल्या भेगा, अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त वातावरणातच शासकीय कर्मचाऱ्यांना राहावे लागले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे शासकीय वसाहतींचे कामे करणे शक्य होत नसल्याचे काही पीडब्ल्यूडीच्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्यामुळे सरकारी कर्मचाºयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
राज्यातील सर्वाधिक मुख्य कार्यालये पुण्यात आहेत. त्यामुळे पुण्यात काम करणाºया सरकारी कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, सर्वच कर्मचाºयांना शासकीय वसाहतीमध्ये खोली मिळत नाही. परिणामी अनेकांना भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहण्याची वेळ येते. शासकीय निवासस्थान मिळणाऱ्यांसाठीही काही महिने किंवा वर्ष-दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वसाहतींमधील डागडुजीची कामे केली जात नसल्याने वसाहतींची दुरवस्था झाली आहे. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीसह, प्रादेशिक मनोरुणालय, येरवडा कारागृह व स्वारगेट येथील वसाहतींची दुरवस्था झाली आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्याचप्रमाणे मनोरुग्णालयातील कर्मचाºयांच्या वसाहतीमधील खोल्या आकाराने लहान असल्याने बहुतांश सर्वच कर्मचाºयांनी स्वत:च्या खर्चाने पत्र्याचे शेड उभे करून त्याचा राहण्यासाठी वापर सुरू केला आहे. त्याचप्रमाणे परिसरात अस्वच्छता असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच वसाहतीच्या सभोवताली गवत उगवले असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
तत्कालीन कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर यांनी येरवडा वसाहतींची पाहणी केली होती. त्याचप्रमाणे मोडकळीस आलेल्या वसाहतींची तत्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, अद्याप या इमारतींची दुरुस्ती झालेली नाही. सुमारे तीन वर्षांपासून खराब झालेल्या ड्रेनेज लाईनचे काम वारंवार तक्रारी दिल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. येरवडा वसाहतीमध्ये मुबलक मोकळी जागा असूनही येथील मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही. जुन्या उद्यानातील खेळणी तुटली असून, त्यांना गंज चढला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीमधील स्वच्छतागृहे बंद पडली आहेत. काही खोल्यांची डागडुजी न केल्यामुळे या खोल्या बंद करण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे तीन मजली इमारतीच्या भिंतींवर पिंपळाची लहान झाडे उगवली आहेत. परिणामी भिंतींना भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. उद्यानात सहा फूट उंचीचे गवत उगवले आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या मुलांनी खेळण्यासाठी कुठे जावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. इमारतीवर पावसाचे पाणी साचत असल्याने वरच्या मजल्यावर राहणाºया कर्मचाºयांचे स्लॅबचे घर गळू लागले आहे. घरांंच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याची तक्रार येथील कर्मचाºयांकडून केली जात आहे. घरे गळत असल्याने सर्वांनीच घरांच्या छपरावर ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे.
शासनाच्या धोरणामुळे निधी कमी पडतोय
शासनाकडून प्राप्त होणाºया अपुºया निधीमुळे शासकीय वसाहतीमधील दुरुस्तीची कामे वेळेत करता येत नाहीत. त्यामुळे शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली असल्याचे मान्य करावे लागते. परंतु, शासनाच्या नवीन धोरणानुसार ठेकेदारांकडून कामे करून न घेता कंत्राटी पद्धतीने देखभाल दुरुस्तीचे काम देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
- भारतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग