कनेरसर-पाबळ रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:49+5:302021-09-27T04:10:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कनेरसर-पाबळ रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कनेरसर-पाबळ रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व लेखक अशोकराव टाव्हरे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हिंमतराव खराडे यांना भेटून अशोक टाव्हरे, कमलाकर रत्नपारखी, सुभाष गोरडे यांनी वस्तुस्थिती सांगितली. खराडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले.
मार्च २०१९ मध्ये २ लाख ४० हजार रुपयांची वर्क ऑर्डर या रस्त्यासाठीची होती. जून २०१९ मध्ये साइडपट्ट्या भरणे व खडीकरण सुरुवात केली असता, नंतर ते काम अतिवृष्टीमुळे वाहून गेले. सलग काम न करता टप्प्याटप्प्यात केले गेले, खड्डे पडले की तात्पुरती डागडुजी करणे हा एककलमी कार्यक्रम राबविला गेला. एवढा मोठा निधी उपलब्ध होऊनही उत्कृष्ट दर्जाचा रस्ता न बनविता निकृष्ट काम केले गेले. औद्योगिकीकरण, कनेरसर येथील यमाई मंदिर व पाबळ येथील जैन मंदिर यामुळे रस्ता वर्दळीचा आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका तसेच दुचाकी चालकांना वाहन चालविणे जिकिरीचे होत आहे.