पुण्यात नव्या 'प्लॉगर' चळवळीचा उदय, जाणून घ्या काय आहे हा प्रकार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 11:58 PM2019-12-14T23:58:59+5:302019-12-15T00:00:02+5:30
व्यवसायाने अभियंता असलेल्या विवेकला त्याच्या 'पुणे प्लॉगर्स' या फेसबुक पेजला इतका प्रतिसाद मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. पण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून अनेक तरुण पुढे आले आणि आता ही संख्या शंभरच्या पुढे पोचली आहे.
नेहा सराफ
पुणे : एकीकडे सोशल मीडियाच्या दुष्परिणामांवर जोमाने चर्चा होत असताना तरुणाई मात्र याच सोशल मीडियाच्या आधारावर काही तरुण आश्वासक कारणांसाठी एकत्र येत आहेत. प्लॉगिंग ही त्यातलीच एक चळवळ. स्वीडनमध्ये काही वर्षांपूर्वी आलेला हा ट्रेंड भारतातही रुजत असून पुण्यातही हा 'प्लॉगर्स' व्यक्तींचा ग्रुप काम करत आहे.
प्लॉगिंग म्हणून प्लास्टिक अधिक जॉगिंग (धावणे). आरोग्यासाठी अनेकजण सकाळी व्यायाम म्हणून धावण्याचा व्यायाम करतात. मात्र धावताना फक्त स्वतःचे आरोग्य न जपता निसर्गाचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न केला जातो. धावताना रिकाम्या हातांनी धावण्यापेक्षा हातात पिशवी घेऊन धावले जाते आणि वाटेतला कचरा पिशवीत गोळा केला जातो. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यामुळे खास स्वच्छतेसाठी द्यावा लागणारा वेळ वाचतो आणि दररोज परिसरही स्वच्छ होतो. पुण्यात विवेक गुरव या तरुणाने ही संकल्पना सुरु केली. व्यवसायाने अभियंता असलेल्या विवेकला त्याच्या 'पुणे प्लॉगर्स' या फेसबुक पेजला इतका प्रतिसाद मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. पण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून अनेक तरुण पुढे आले आणि आता ही संख्या शंभरच्या पुढे पोचली आहे. याच कामासाठी त्याला कामासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने दिल्ली येथे कर्मवीर पुरस्काराने गौरवले आहे.
आत्तापर्यंत या प्लॉगर्सनी दिघीचा डोंगर, जंगली महाराज रस्ता, मुठा नदीपात्र, बाणेर-पाषाण लिंक रोड आणि अशा अनेक भागात ही मोहीम राबवली आहे. त्यातून गोळा होणारा काही प्लास्टिक कचरा पुनर्निर्माणासाठी जातो तर मद्याच्या बाटल्या या बचत गटांना शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी दिल्या जातात. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास ५००० बाटल्या गोळा केल्या असून ४००० प्लास्टिक किलो कचरा गोळा केला आहे.
याबाबत विवेक सांगतो, 'या गटात काम करणारे आम्ही निसर्गासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही कोणाही आधी एकमेकांना ओळखत नव्हतो. पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती म्हणून सोशल मीडियावर वाचून मी सुरुवात केली आणि आज अनेकजण यात सहभागी झाले आहेत. आमच्या गटात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक असे सर्व क्षेत्रातले तरुण आहेत. पुण्यातल्या प्रत्येक भागात ही चळवळ वाढावी याच भावनेने काम सुरु केले आहे'.
घरी जाऊनही घेतात कचरा
अनेक जणांच्या घरातही मोठ्या प्रमाणावर प्लस्टिक कचरा असतो. मात्र काही कारणाने कचरा आणून दिला जात नसेल तर हा समूह जाऊन त्यांच्या घरून आणि सोसायटीमधूनही प्लास्टिक कचरा घेऊन येतो. शहारातील उपनगर भागातील काही सोसायट्यांमध्ये असे काम केले जाते.
कोणत्याही भागात होऊ शकते सुरुवात
या कामात कोणत्याही एका व्यक्तीचा पुढाकार नाही. त्यामुळे असे काम कोणीही सुरु करू शकतो. खरं तर हाच त्या मागचा उद्देश असून तरुणांनी स्वयंप्रेरणेने हे काम आपापल्या भागात सुरु करावे हाच या मागचा उद्देश असल्याचे विवेक'ने लोकमतशी बोलताना सांगितले.