गुंजवणी धरणग्रस्तांना भूखंडांचे वाटप पूर्ण
By admin | Published: March 29, 2016 03:32 AM2016-03-29T03:32:03+5:302016-03-29T03:32:03+5:30
गुंजवणी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेले आश्वासन काही प्रमाणात पूर्ण केले आहे. आठच दिवसांत शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना
पुणे : गुंजवणी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेले आश्वासन काही प्रमाणात पूर्ण केले आहे. आठच दिवसांत शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना घरासाठीच्या भूखंडांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुनर्वसन अधिकारी नयना बोदार्डे यांनी दिली.
गुंजवणी धरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण होत आले असून, अन्य काम प्रगतिपथावर आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे मात्र प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तातडीने फेबु्रवारी महिन्यात संबंधित सर्व अधिकारी व धरणग्रस्तांची बैठक घेतली. या बैठकीत येत्या दोन महिन्यांत बहुतेक सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राव यांनी दिले होते.
याबाबत बोदार्डे यांनी सांगितले की, कोदापूर आणि भोसलेवाडीच्या गावठाणाच्या प्रश्न पावसाळ्यापूर्वी तातडीने मार्गी लावणे गरजेचे होते. त्यानुसार गावठाण क्रमांक एकमध्ये ३९ धरणग्रस्तांना घरासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. तर गावठाण क्रमांक दोनमध्ये १५४ पैकी १२७ धरणग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)