चरख्यावर सूतकताई, स्वच्छतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:57 PM2018-10-02T22:57:46+5:302018-10-02T22:58:15+5:30

राष्ट्रपिता गांधी व शास्त्री जयंती : विविध विधायक उपक्रमांतून जिल्ह्यात थोर नेत्यांना अभिवादन

Plow Shirt, Sworn oath, celebrate of gandhi jayanti | चरख्यावर सूतकताई, स्वच्छतेची शपथ

चरख्यावर सूतकताई, स्वच्छतेची शपथ

Next

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीनिमित्त चरख्यावर सूतकताई करण्याचा अनुभव घेतला. महाविद्यालयातील इतिहास विभागतर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी विचारधारा प्रदर्शन आयोजित केले. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना धनाजी शेळके यांनी आजच्या समाजातील स्थैर्य व स्वास्थ्य टिकविण्यासाठी गांधी विचारांची गरज असल्याचे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद निंबाळकर यांनी गांधीजींचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विषद केले. संयोजक डॉ. नंदकुमार जाधव व शोभा वाईकर यांनी गांधीजीच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी चरख्यावर सूतकताईचे प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, अशोक दिवेकर, भाऊसाहेब दरेकर, नानासाहेब जावळे, मनीषा जाधव, शाम वास्नीकर, ओंकार अवचट व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केडगाव येथील खादी ग्रामोद्योग भवनचे संचालक भानुदास ढवळे यांनी केली.

कनेरसर शाळेत जीवनकार्याची दिली माहिती
वाफगाव : जि. प. प्राथ. शाळा कनेरसर येथे महात्मा गांधी, व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. मुलांनी स्वच्छते विषयी घोषणा देवून जनजागृती केली. मुलांनी शालेय परिसरात स्वच्छता केली नंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मुलांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळेचे मुख्याध्यापक नाना गावडे यांनी महात्मा गांधीं व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. सर्व शिक्षिकांची भाषणे झाली. प्रास्ताविक अंजली शितोळे यांनी केले. सूञसंचालन सारीका राक्षे यांनी केले. आभार शुभांगी जाधव यांनी मानले.

आंबेठाणला सर्वांनी घेतली स्वच्छतेची शपथ
आंबेठाण : येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी झाली. संपूर्ण गावासह वाड्या वस्त्यांमधून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दत्तात्रय मांडेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. ग्रामविस्तार अधिकारी सयाजी क्षीरसागर यांनी स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी विस्तार अधिकारी थोरात, माजी सरपंच व विद्यमान ग्रा. पं. सदस्य अशोक मांडेकर, सुभाष मांडेकर, गणेश मांडेकर, चंद्रकांत चव्हाण, दिलीप नाईकनवरे, अशोक मानमोडे, शिवाजी डावरे, दगडू मांडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच दत्तात्रय मांडेकर यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळा, अंगणवाड्या, गावासह वाड्यावस्त्यांमध्ये स्वच्छता दिवस पाळणे, स्वच्छतेच्या कार्यात लोकसहभाग वाढविणे, कचरा विलगीकरणासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे सांगितले.

झील शाळेच्या चिमुकल्यांनी बसस्थानक केले चकाचक
पौड : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहाद्दर शास्त्री यांची जयंती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पौड येथील झील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पौड बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. पहिली ते चौथीपर्यंतच्या दीडशे विद्यार्थ्यांनी बसस्थानक आणि परिसरात पडलेला कचरा गोळा करून स्वच्छता केली. स्वत: तयार केलेले घोषणाफलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. या वेळी झील स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत वाल्हेकर, चाले विभागाचे गटप्रमुख मधुकर येनपुरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख दिलीप गुरव, ग्रामसेवक हनुमंत भंडलकल, लिपिक राजेंद्र वाव्हळ, बसस्थानकाचे व्यवस्थापक महामुनी, विष्णूपंत वाल्हेकर, शिक्षक मनीष साठे, पूनम राक्षे, अश्विनी संकपाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Plow Shirt, Sworn oath, celebrate of gandhi jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.