बिबट्याने तीन हजार जनावरे केली फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:59 AM2018-04-22T06:59:59+5:302018-04-22T06:59:59+5:30
मागील चार वर्षांत बिबट्याने तब्बल ३०९२ जनावरे फ स्त केली आहेत. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुणे : पर्यटनाकरिता राज्यातील पर्यटनप्रेमींचे खास आक र्षण असणाऱ्या आणि बागायती, ऊसलागवडीकरिता प्रसिद्ध म्हणून सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या जुन्नर तालुक्याची वेगळी ओळख आहे. सध्या या तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असून मागील चार वर्षांत बिबट्याने तब्बल ३०९२ जनावरे फ स्त केली आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रामुख्याने बागायती पट्टा म्हणून जुन्नर हा तालुका ओळखला जातो. तालुक्यातील चार धरणे त्यामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक घेतले जाते. बिबट्याला लपण्यासाठी उसाचे पुरेसे क्षेत्र असल्याने त्यात त्यांची संख्या लक्षणीय आहे. जुन्नर वनविभाग अंतर्गत ओतूर, जुन्नर, मंचर, खेड, घोडेगाव, शिरूर, चाकण या सात वनपरिक्षेत्रांचा समावेश होतो. त्यापैकी ओतूर, नारायणगाव, आळेफाटा, राजुरी या भागात मोठ्या संख्येने बिबटे आढळतात. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे, तिथे वनखात्याच्या वतीने पिंजरा लावण्यात येतो. त्यात बिबट्यासाठी शेळी बांधली जाते. पिंजरा लावून जे बिबटे पकडण्यात येतात त्याची रवानगी माणिकडोहच्या निवारण केंद्रात करण्यात येते. सध्या त्या निवारण केंद्रात ३५ बिबटे ठेवण्यात आले आहेत. वनविभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बिबट्याने चार वर्षांत ३०९२ जनावरे फस्त केली आहेत. या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी, बैल यांबरोबरच कोंबड्या, कुत्रे यांचा समावेश आहे. शासनाच्या वतीने पीडित शेतकºयांना आर्थिक मदत केली जाते. मात्र बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. मागील काही वर्षांमध्ये मानवी वस्तीतील बिबट्याचा वावर आणि त्यामुळे नागरिकांची केलेली शिकार याची आकडेवारी पाहिल्यास मागील चार वर्षात ७ व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असून १७ व्यक्तींना त्याच्या हल्ल्यात गंभीर शारीरिक इजा झाली आहे. घरातील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यावर बिबट्याकडून हल्ल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्या भागात शेतकºयांनी बिबट्याला बघितले तिथे पिंजरा लावल्यानंतरदेखील तावडीत न सापडण्याची अनेक उदाहरणे दिसून आली आहेत.
लेपर्ड अॅम्बेसिडर
बिबट्या हा काही हल्लेखोर प्राणी नाही. तो जर तसा असता तर त्याने सरसकट सगळ्यांवर हल्ले केले असते. आम्हाला मिळणारी माहिती आणि केलेली तपासणी यामुळे बिबट्याचे हल्ले कमी होऊन त्याचा आणि नागरिकांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शेतात काम करताना, परिसरात फिरताना, नागरिकांना घरी जाताना त्याच्या दिसण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. यामुळे त्यांच्यातील भीती वाढली असून प्रशासना च्यावतीने लेपर्ड अँबेसिडर या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्यातून ९१ लेपर्ड अँबेसिडर तयार करण्यात आले आहेत. याशिवाय बिबट्याविषयीच्या जनजागृतीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रचार सुरू आहे.
- डॉ. अजय देशमुख (पशुवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र)