पीएमपीच्या ब्रेकडाऊनला लागणार ‘ब्रेक’
By admin | Published: January 10, 2016 03:58 AM2016-01-10T03:58:41+5:302016-01-10T03:58:41+5:30
पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदाराच्या ब्रेकडाउनला आता लगाम बसणार आहे. यापुढे ठेकेदारांची बस ब्रेकडाउनमुळे एका तासापेक्षा अधिक काळ रस्त्यावर थांबल्यास प्रतिबस ५०० रुपयांचा
पुणे : पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदाराच्या ब्रेकडाउनला आता लगाम बसणार आहे. यापुढे ठेकेदारांची बस ब्रेकडाउनमुळे एका तासापेक्षा अधिक काळ रस्त्यावर थांबल्यास प्रतिबस ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यासाठीचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ठेकेदाराच्या ब्रेकडाऊन होणाऱ्या बसची संख्या अधिक असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय आणि पीएमपीचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पीएमपीच्या दररोज सुमारे १५०० बस धावतात, त्यातील सुमारे ७५० बस ठेकेदाराकडून घेण्यात आलेल्या आहेत. त्या बसमधील सरासरी १३० ते १५० बस दररोज ब्रेकडाउनमुळे शहरातील रस्त्यावर बंद पडतात.
या बस बंद पडल्यानंतर त्या रस्त्यावरून बाजूला काढण्याची, तसेच ती दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. पीएमपीच्या बस बंद पडल्यास त्या एका तासात दुरुस्त करून ती रस्त्यावर पुन्हा आणली जाते. मात्र, ठेकेदराच्या बसला अशा प्रकारचे बंधन नसल्याने त्यांच्या बस दिवसभर रस्त्यावर उभ्याच असतात. फेऱ्या अचानक रद्द झाल्याने पीएमपीला दरदिवशी लाखो रुपयांचा फटका बसतो.
त्यामुळे या पुढे ठेकेदारांनी एका तासाच्या आत ब्रेकडाउन झालेली बस रस्त्यावरून काढून घेतली नाही, तर हा दंड आकारला जाणार आहे. त्याबाबत प्रशासनाने ठेवलेल्या निवेदनास अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी मान्यता दिली आहे.
(प्रतिनिधी)
वाहतूककोंडीतही भर
शहरातील रस्त्यावर पीएमपीची बस बंद पडल्यानंतर ती तातडीने हलविली जाते. त्यासाठी एका तासाच्या आत ब्रेकडाउन वाहन पाठवून हे काम केले जाते. मात्र, ठेकेदाराच्या बस बंद पडल्यास त्या तासन्तास रस्त्यावर ‘जैसे थे’ असतात, तर त्या तातडीने बाजूला काढण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वदर्ळीच्या वेळी या बस बंद पडल्यास शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. दोन दिवसांपूर्र्वी शहरातील काही रस्त्यावर ९ ते १० बस बंद पडल्या होत्या. त्यामुळे जवळपास अर्ध्या शहरात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे शेकडो पुणेकरांना तासन्तास ताटकळत बसावे लागले होते.