पीएमपी दिवसेंदिवस होतेय म्हातारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:57 AM2018-04-09T00:57:03+5:302018-04-09T00:57:03+5:30

मागील काही वर्षांत नवीन बस ताफ्यात न झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा ‘म्हातारी’ होऊ लागली आहे. निम्म्याहून अधिक बसेस ९ वर्षे मार्गावर धावत असून अखेरच्या घटका मोजत आहे.

PM is growing day by day | पीएमपी दिवसेंदिवस होतेय म्हातारी

पीएमपी दिवसेंदिवस होतेय म्हातारी

Next

पुणे : मागील काही वर्षांत नवीन बस ताफ्यात न झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा ‘म्हातारी’ होऊ लागली आहे. निम्म्याहून अधिक बसेस ९ वर्षे मार्गावर धावत असून अखेरच्या घटका मोजत आहे. देखभाल-दुरूस्तीअभावी अनेक बसेस त्यांच्या क्षमतेनुसार धावत नसल्याने त्यात आणखी भरच पडत चालली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुरेशी बसखरेदी न झाल्यास ‘पीएमपी’चा डोलारा कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज १० लाखांहून अधिक प्रवाशांचा भार ‘पीएमपी’ची बससेवा वाहत आहे. सध्या पीएमपीच्या मालकीच्या १,३४९ बस कागदोपत्री अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात त्यापैकी हजार ते अकराशे बसच मार्गावर धावतात. ताफ्यात २००० सालापासूनच्या बस असून मागील महिनाभरात ६१ बस दाखल झाल्या आहेत. ‘पीएमपी’ संचालक मंडळाने काही वर्षांपूर्वी बसचे वयोमान १२ वर्षांचे निश्चित केले असून ८ लाख ४० हजार किलोमीटर धावल्यानंतर त्यांना मार्गावर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठरावाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तब्बल १२ वर्षे मार्गावर धावल्याने खिळखिळ्या झालेल्या एकूण २५० बसपैकी काही बस अजूनही सेवेत आहेत.
‘पीएमपी’ प्रशासनाकडून या बसेस भंगारात काढण्याची तयारी केली असली तरी नवीन बस मिळत नसल्याने त्याचा वापर सुरूच ठेवला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’कडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सेवा दिली जात असल्याचा टीका सातत्याने होते. पीएमपीच्या ताफ्यात सध्या २००० सालानंतरच्या बस असून ११ बस त्यावर्षीच्या आहेत. या बस कागदोपत्री ताफ्यात दाखविण्यात येत असल्या तरी त्या भंगारात काढण्यात आल्या आहेत.
१२ वर्षे व त्यापुढील बसेसची संख्या २५० आहेत. १० वर्षांपुढील बसेसची संख्या तब्बल ५६३ एवढी आहे. तर ९ वर्षे रस्त्यावर धावलेल्या बस १९४ आहेत. त्यामुळे ९ वर्षे व त्यापुढील बसेसची संख्या तब्बल ७५७ म्हणजे एकूण मालकीच्या बसेसच्या ५६ टक्के एवढ्या आहेत. तर ८ वर्षांखालील बसेसची संख्या ५९२ एवढी आहे. त्यामुळे पुढील तीन-चार वर्षांत २०० हून अधिक बसेसच वयोमान संपणार आहे.
>हवी नवीन बसेसची ‘संजीवनी’
‘पीएमपी’ला २०१५ पासून केवळ ७३ नवीन बस मिळाल्या असून त्यापैकी ६१ मिडी बस मागील महिनाभरात आल्या आहेत. खिळखिळ्या झालेल्या बसेसवरच अवलंबून राहावे लागत आहे. नवीन बसेसच्या खरेदीला सातत्याने विलंब होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत मार्गावरील बस कमी असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ला शक्य तितक्या लवकर नवीन बसेसची ‘संजीवनी’ मिळण्याची गरज आहे.
>देखभाल-दुरुस्तीचा अभाव
ताफ्यातील अनेक बसेसची मॉडेल संबंधित कंपन्यांनी बंद केली आहेत. त्यामुळे या बसेसचे सुटे भाग मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे इतर मॉडेलचे सुट्टे भाग वापरून संबंधित बसची दुरुस्ती करावी लागते. परिणामी, या बसेस क्षमतेप्रमाणे धावू शकत नाहीत. देखभालीमध्ये अनेकदा निष्काळजीपणा होत असल्याचे प्रशासनाकडून मान्य केले जाते. त्यामुळेही बस लवकरच खिळखिळ्या होत असल्याचे चित्र आहे. वयोमान १२ वर्षे किंवा ८ लाख ४० हजार किलोमीटर ठेवले असले
तरी देखभाल-दुरूस्तीअभावी त्याआधीच बसेस जर्जर
होत आहेत.
>५०० ई-बस वर्षअखेरपर्यंत


‘पीएमपी’ला बस घेण्याची तातडीने गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून वर्षअखेरपर्यंत ५०० इलेक्ट्रॉनिक बस रस्त्यावर आणल्या जातील. त्याची निविदा प्रक्रिया पुढील महिनाभरात सुरू केली जाणार असल्याची माहिती ‘पीएमपी’चे संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी ई-बसला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार काही कंपन्यांनी तयारीही दर्शविली आहे. पुढील महिनाभरात जागतिक पातळीवरून ई-बस आॅपरेटरसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.
या बस ‘पीएमपी’ खरेदी करणार नसून आॅपरेटरमार्फत चालविल्या जातील. त्यासाठी त्यांना प्रतिकिमीप्रमाणे दर निश्चित करून दिला जातील.
तसेच चार्जिंग व इतर देखभालीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे शिरोळे यांनी सांगितले.


२०० मिडीबसपैकी काही बस ताफ्यात आल्या. इतरही लवकरच येतील.३० तेजस्विनी बसही येणार आहेत. त्यामुळे या वर्षात पीमपीला ७३० बस मिळतील. सध्याच्या जुन्या २५० बस भंगारात काढल्यानंतरही एकूण ४८० बसेसची भर पडेल, असेही शिरोळे यांनी नमूद केले.

Web Title: PM is growing day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.