‘पीएम किसान’चे ठरले, ‘नमो शेतकरी’चा पत्ता नाही..! राज्य सरकारकडून हालचाल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 11:52 IST2025-02-23T11:51:21+5:302025-02-23T11:52:22+5:30
राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार

‘पीएम किसान’चे ठरले, ‘नमो शेतकरी’चा पत्ता नाही..! राज्य सरकारकडून हालचाल नाही
पुणे - केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) दिला जाणार आहे. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी पाच ऑक्टोबर रोजी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. याचवेळी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्तादेखील देण्यात आला. त्यानंतर डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या चार महिन्यांसाठीचा पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) वितरित हाेणार आहे.
बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. यासाठी १ हजार ९६७ कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठीच केंद्र व राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित वितरित केले होते. मात्र, आता विधानसभा निवडणुका संपल्या असल्याने राज्य सरकारकडून सहाव्या हप्त्याचे नियोजन नसल्याचे या सूत्रांनी सांगितले.
पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचे जिल्हानिहाय शेतकरी
जिल्हा - शेतकरी - रक्कम (कोटींत)
अहिल्यानगर - ५,४९,९७३ -११४.६५
अकोला - १,९०,५४७ - ४०.७३
अमरावती - २,७३,७७० - ५७.४४
छत्रपती संभाजीनगर - ३,४५,५८९- ७१.३३
बीड - ३,७८,१३३ - ७९.६८
भंडारा - २,१९,३८१ - ४६.४५
बुलढाणा - ३,४४,५०६ - ७३.५८
चंद्रपूर - २,५०,२९५ - ५३.१५
धुळे - १,५७,२१५ - ३५.०१
गडचिरोली - १,५२,३९७ - ३२.४२
गोंदिया - २,२२,३६१ - ४६.५५
हिंगोली - १,७७,०२२ - ३६.०२
जळगाव - ४,०७,८४२ - ८८.१८
जालना - ३,००,११४ - ६३.९९
कोल्हापूर - ४,८२,८०४ - १०४.८१
लातूर - २,७१,८६४ - ५६.९०
नागपूर - १,८०,४९२ - ३९.९९
नांदेड - ३,८६,००३ - ७९.२७
नंदूरबार - १,०४,७१८ - २२.१९
नाशिक - ४,४१,७३१ - ९२.९५
धाराशिव - २,३७,५२२ - ५०.९६
पालघर - ९९,६७९ - २१.११
परभणी - २,५१,९३१ - ५२.२४
पुणे - ४,४३,६४९ - ९३.०४
रायगड - १,१६,९६० - २५.५९
रत्नागिरी - १,५७,८५८ - ३४.८०
सांगली - ४,००,४४७ - ८३.६४
सातारा - ४,५०,६६० - ९५.४९
सिंधुदुर्ग - १,२२,२६५ - २५.८१
सोलापूर - ५,०३,०९२ - १०७.१५
ठाणे - ७४,९६९ - १६.२२
वर्धा - १,३०,७५१ - २७.४६
वाशिम - १,६७,३२१ - ३६.३०
यवतमाळ - २,९४,००५ - ६१.९८
एकूण - ९२,८८,८६४ - १९६७.०८