पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 11:10 PM2017-12-05T23:10:18+5:302017-12-05T23:10:33+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहे. तुकाराम मुंढेंनी गेल्या सहा महिन्यात जवळपास नऊशेच्यावर कर्मचा-यांच्या बदल्या केल्या आहे. त्यातल्या सातशेच्या आसपास बदल्या या दोन दिवसांत केल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच पदावर काम करत असलेल्या चालक वाहक, लिपिक, वरिष्ठ कार्यालय अधीक्षक, मदतनीस, फिटर, क्लिनर, मॅकेनिक, अशा अनेक पदांवरील कर्मचा-यांचा समावेश त्यात आहे.
मुंढे यांनी पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार करण्यापासून ते प्रवाशांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यापर्यंत काम केले. पीएमपी बसच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी संख्या ठेवण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहिलेल्या अनेक कर्मचा-यांकडून कामकाजात कोणतीही सुधारणा नाही तसेच वाहक, चालकांना स्टार्टर, लाईटमन, रिपेअरिंग यांसारखी इतर कामे देण्यात आली होती, असे दुसरे कारण बदल्यांमागे देण्यात आले आहे. पीएमपीतील वरिष्ठ अधिका-यांच्या मर्जीनुसार हे कर्मचारी कामकाज करत होते. मुंढे यांनी या बदल्या करुन पीएमपीमध्ये चालत आलेली ही मर्जीशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
विकासात्मक आकृतीबंध आराखडाच तयार नसल्याने अनेक वर्ष पीएमपीएलमध्ये मनमानीपणे कर्मचा-यांचे काम सुरु होते. तसेच या कालावधीत नवीन पीएमपी कर्मचारी भरती देखील सुरु राहिली. त्यामुळे पीएमपीवरचा आर्थिक बोजा वाढत जाऊन तोट्याचे प्रमाण काही कोटींमध्ये वाढले, अशी माहिती पाीएमपीच्या एका वरिष्ठ अधिका-याने ‘लोकमत’ ला दिली.
बदल्या बेकायदेशीर
पीएमपीच्या फेर आस्थापना आराखडा तयार करताना प्रशासनाने औद्योगिक कामगार कायदा ९ अ प्रमाणे मान्यताप्राप्त कामगार संघटनेस आगाऊ लेखी सूचना देणे व चर्चा करणे बंधनकारक आहे. ते न करताना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी परस्पर नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्याला इंटक कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात जाऊन स्थगिती घेतली होती. या याचिकेवर ८ डिसेंबरला सुनावणी असताना मंगळवारी कार्यालयीन वेळ संपत असताना सायंकाळी अचानक ६२० कामगारांच्या बदल्या केल्या आहेत. ही बाब न्यायालयाचा अवमान करणारी व कामगारांवर सरसकट अन्याय करणारी आहे, असे पीएमपी कामगार संघाचे सल्लागार गोपाळ तिवारी यांनी सांगितले.