पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या पगडीवरील अभंगामुळे गोंधळ; देवस्थानाने अभंगात केला बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:52 AM2022-06-14T08:52:46+5:302022-06-14T09:06:14+5:30
देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच येत आहेत...
पिंपरी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या देहूगावातील शिळामंदिर लोकापर्णण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. त्यात देवस्थानाच्या वतीने पंतप्रधानांना तुकोबांची पगडी परिधान करण्यात येणार आहे. पंतप्रधानासाठी पुण्यातील फेटेवाल्याने तयार केलेल्या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणो काठी...’ हा अभंग लिहला होता. त्यात देवस्थानाने बदल केला आहे. ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ...’ हा अभंग लिहला आहे.
मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच येत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली आहे. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देण्यात येणार आहे.
पुण्यातील एका पगडी तयार करणाऱ्या दुकानदाराने पंतप्रधानाच्या स्वागतासाठी पगडी तयार केली होती. त्यावर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणो काठी...’असा अभंग लिहला होता. हीच पगडी पंतप्रधानांना देणार? असे वृत्त सोशल मिडीयावर पसरले. त्यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाली. फेटेवाल्याचा हा अतिशहाणपणा देवस्थानासाठी डोकेदुखी ठरला होता.
त्यानंतर संबंधित दुकानदाराने ही पगडी संत तुकाराम महाराज देवस्थानाच्या प्रतिनिधींना दाखविली. त्यावर या अभंगाऐवजी ‘‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ...’ हा अभंगच लिहण्यात यावा, अशी सूचना केली. त्यानुसार पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या पगडीवर ‘विष्णूमय जग...हाच अभंग असणार आहे. पगडी तयार करणाऱ्या त्या पगडीशी देवस्थानाचा काहीही संबंध नसल्याचे विश्वस्तांनी कळविले आहे.
पुण्यातील संबंधित व्यक्तीचे पगडी आणि वारकरी वेशभूषा साहित्य आणि पताका तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी पंतप्रधान देहूला येणार म्हणून पगडी तयार केली होती. देवस्थानाच्या वतीने जेव्हा पगडी विषयावर चर्चा झाली. त्यावेळी पगडीवर अभंग घ्यायचा असेल तर ‘‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ...’ हाच अभंग वापरणे सर्मपक ठरेल, असे ठरले. देवस्थानाने सुचविलेला अभंग हाच आहे. त्या दुकानदाराने काही वेगळ्याच अभंगाची पगडी तयार केली असेल. त्याच्याशी संस्थान किंवा वारकऱ्यांचा काहीही संबंध नाही.
-संजय महाराज मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज देवस्थान