पंतप्रधानांच्या सुरक्षेवर दिवसाला येताे 'एवढा' खर्च; ताफ्यात असणार ३५ पेक्षा अधिक वाहने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:44 AM2023-08-01T08:44:50+5:302023-08-01T08:46:19+5:30

माेदींचे वाहन काेणते, हे गुप्त असणार !...

pm narendra modi lokmanya tilak national award pune pm security costs More than 35 vehicles will be in the fleet | पंतप्रधानांच्या सुरक्षेवर दिवसाला येताे 'एवढा' खर्च; ताफ्यात असणार ३५ पेक्षा अधिक वाहने

पंतप्रधानांच्या सुरक्षेवर दिवसाला येताे 'एवढा' खर्च; ताफ्यात असणार ३५ पेक्षा अधिक वाहने

googlenewsNext

पुणे :पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी कार्यक्रमस्थळी पाेहचण्याच्या मार्गापासून ते अगदी कार्यक्रम स्थळावरील सुरक्षेशी संबंधित नियम स्थानिक पोलिस ठरवतात. पोलिसांच्या निर्णयावर एसपीजी अधिकारी देखरेख ठेवतात. केंद्रीय एजन्सी एएसएल पंतप्रधानांच्या स्थळ आणि मार्गावर सुरक्षा तपासणी करते. ही एएसएल टीम केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असते. केंद्रीय एजन्सींचे अधिकारी एएसएलच्या मदतीने पंतप्रधानांच्या भेटीवर लक्ष ठेवतात. यासोबतच पंतप्रधानांच्या जवळ येणाऱ्या लोकांची तपासणी एसपीजी घेते आणि पंतप्रधानांच्या आजूबाजूची सुरक्षा पाहते. संसदेत २०२०मध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेवर दिवसाला १ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च होतो. पंतप्रधानाच्या पुणे दौऱ्यासाठी दिल्ली येथून ७० ते ८० जणांच्या सुरक्षारक्षकांचा ताफा आला असल्याची माहितीदेखील सुत्रांनी दिली.

एसपीजीची स्थापना कशी झाली?

पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी १९८१ पूर्वी दिल्ली पोलिसांच्या पोलिस उपायुक्तांची होती. यानंतर सुरक्षेसाठी एसटीएफची स्थापना करण्यात आली. दरम्यान, १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार १९८५मध्ये एक विशेष युनिट स्थापन करण्यात आले, ज्याला विशेष संरक्षण युनिट असे नाव देण्यात आले. या युनिटला पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली. आता हे युनिट देशातील अनेक लोकांना विशेष संरक्षण देते.

एसपीजी सुरक्षा विशेष का आहे?

एसपीजी सुरक्षेबद्दल बोलायचे तर, एसपीजी कमांडोना फिजिकल, शूटिंग, वॉर, प्रॉक्सिमिटी प्रोटेक्शन (क्लोज सिक्युरिटी स्ट्रॅटेजी) चे विशेष प्रशिक्षण दिले जाते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गुंतलेले सुरक्षा कर्मचारी बिझनेस सूट, स्पेशल ग्लासेस, कम्युनिकेशन ईअरपीस परिधान करतात. याशिवाय कमांडोना खास बंदुका दिल्या जातात, त्या अतिशय अत्याधुनिक गन असून, त्या खास तयार केल्या जातात. कमांडो त्यांच्या सुरक्षिततेसाठी हलक्या वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट आणि सहकारी कमांडोशी बोलण्यासाठी ते कानात ईअर प्लग किंवा वॉकी-टॉकी वापरतात. एसपीजी जवानांसोबत एनएनएफ २००० असॉल्ट रायफल्स, ऑटोमॅटिक गन व १७ एम रिव्हॉल्वर यांसारखी अत्याधुनिक शस्त्रे असतात.

माेदींचे वाहन काेणते, हे गुप्त असणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एसपीजीची सुरक्षा व्यवस्था असते. त्यांची संपूर्ण जबाबदारी पीएमओ हाऊसची असते. त्यांना लागणाऱ्या सुविधा व मनुष्यबळ राज्याने पुरवायचे असते. कार्यक्रमादरम्यान कोणतीही गोष्ट त्यांच्या एसपीजी अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच ती होते. पंतप्रधान मोदी यांच्या सभोवती पहिले २ सर्कल हे केंद्रीय सुरक्षा रक्षकांचे कडे असते. त्यानंतर तिसरे व चौथे सर्कल हे राज्यातील एसपीजीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या अधिकाऱ्यांचे असते.

वाहनाबाबत गुप्तता :

पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात १९ वाहने असतील. त्यात तीन बुलेटप्रूफ असून, त्यापैकी कोणत्या गाडीत मोदी बसणार हे गुप्त असेल. संपूर्ण ताफ्यात सुरक्षेशी संबंधित १९ वाहने असतात. त्याशिवाय, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रमुख नेते, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आणि शासकीय अधिकारी यांची वाहने मिळून ३५ ते ४० वाहनांचा समावेश असतो.

जॅमर वाहनही ताफ्यासोबत...

पंतप्रधानांच्या वाहनासोबत जॅमर असलेली कारही ताफ्यासोबत असते. ते कोणत्याही रेडिओ कंट्रोल किंवा रिमोट कंट्रोल डिव्हाइसला रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरापर्यंत ठप्प करतात, रिमोटद्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या बॉम्ब किंवा आयईडीचा स्फोट रोखतात.

Web Title: pm narendra modi lokmanya tilak national award pune pm security costs More than 35 vehicles will be in the fleet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.