Pune: पुण्यात पंतप्रधानांचा आजवरचा सर्वात संवेदनशील बंदोबस्त; पाच हजार पोलीस तैनात
By विवेक भुसे | Published: July 31, 2023 08:23 PM2023-07-31T20:23:12+5:302023-07-31T20:23:33+5:30
पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी दुपारपर्यंत मध्य भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाचवेळी तीन ठिकाणी कार्यक्रम, शहरातील सर्वात दाट वस्ती असलेला भाग, चिंचोळे रोड, दहशतवाद्यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारचा दौरा पोलिसांच्या दृष्टीने आजवरचा सर्वाधिक संवेदनशील बंदोबस्त असणार आहे. या बंदोबस्तासाठी ५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी सोमवारी संपूर्ण बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यांच्याबरोबर राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश होता. याशिवाय राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, असे वेेगवेगळ्या विभागाचे ३ हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा वेगळा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे उपायुक्त पी. राजा आदींनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. विशेष सुरक्षा पथकाने पंतप्रधानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. हेलीकाॅप्टर उतरण्याचे ठिकाण (हेलीपॅड), कार्यक्रम स्थळ, तसेच पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीच्या पथकांकडे असणार आहे.
पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त लक्ष्मी रस्ता परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारपर्यंत मध्य भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता तसेच उपरस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी पंतप्रधान दिल्लीला रवाना झाल्यानंतर व्यापारी पेठेतील सर्व व्यवहार सुरळीत होतील.
शहरातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता हा सर्वात गजबलेला भाग आहे. येथील रस्तेही चिंचोळे आहेत. तसेच या रस्तांना पर्यायी रस्ते नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहाण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांचा ताफा या रस्त्यावरुन जात असताना सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे.