पंतप्रधान डिसेंबरअखेर पुणे दौऱ्यावर; मेट्रोचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 11:52 AM2021-12-08T11:52:54+5:302021-12-08T11:53:25+5:30
पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन ते करणार आहेत. यादृष्टीने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरअखेर पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन ते करणार आहेत. यादृष्टीने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यातच महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र या माहितीस दुजोरा मिळू शकला नाही. ओबीसी आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने यासंदर्भात स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले.
सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडे तयार झाले आहेत. या दोन्ही महापालिकांसह पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही येत्या जानेवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा होतो आहे. पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा देशातील पहिली पीपीपी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प आहे. पुण्यातील या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ न मिळाल्याने भूमिपूजन रखडले आहे. हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने १२०० कोटी रुपये दिले आहेत. या मेट्रोचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते या महिनाअखेरीस होऊ शकते. या दोन कार्यक्रमांशिवाय स्वतंत्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात पंतप्रधानांना गुंतवू नये, असाही मतप्रवाह असल्याने यासंदर्भातील निर्णय झालेला नाही.