पीएमपीच्या निलंबित २९ कर्मचाऱ्यांना ‘माफी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:18 AM2018-06-02T07:18:11+5:302018-06-02T07:18:11+5:30
बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला
पुणे : बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. पूर्वीचे चांगले वर्तन लक्षात घेऊन तसेच सध्याची कर्मचाºयांची गरज पाहून या कर्मचाºयांना निलंबनातून माफी मिळाली आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दोन अधिकाºयांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन काळात नुसतेच वेतन देण्यापेक्षा त्यांचे निलंबन रद्द केल्यास कामकाज होईल, असा दावा करीत प्रशासनाने त्यांचे निलंबन रद्द केले. हाच नियम आता इतर कर्मचाºयांनाही लागू करण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचाºयांचे विविध कारणांसाठी निलंबन करण्यात आले. त्यामध्ये अपघात, बेशिस्त वर्तन, गैरहजेरी, उद्धट वर्तन, निष्काळजीपणा, कामचुकारपणा, तिकीट रकमेत तफावत अशा विविध कारणांचा समावेश आहे.
पीएमपीकडे ६२ कर्मचाºयांच्या निलंबनाची प्रकरणे होती. चौकशी विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या विभागात चौकशीची इतरही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने कर्मचाºयांच्या विविध प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी प्रशासनाने नुकतीच सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. ही कामे मार्गी लावण्याबरोबरच समितीकडे निलंबित कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतही काम देण्यात आले आहे.
समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये एकूण निलंबित कर्मचारी व त्यांचे यापूर्वीचे वर्तन यावर चर्चा करून ३१ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कर्मचाºयांवरील आरोप किरकोळ स्वरूपाचे असल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. परंतु त्यांची सेवेत आल्यानंतरही चौकशी सुरूच राहणार आहे.
समितीने २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. या कर्मचाºयांवर किरकोळ स्वरूपाचे आरोप आहेत. लवकरच त्यांचे निलंबन रद्दचे आदेश काढले जातील. - सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी