PMC: दुहेरी मोक्कातील आरोपीने केली पुणे महापालिकेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:46 PM2023-11-04T12:46:42+5:302023-11-04T12:48:56+5:30

या प्रकरणी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे....

PMC: Accused in double-dealing cheated Pune Municipal Corporation | PMC: दुहेरी मोक्कातील आरोपीने केली पुणे महापालिकेची फसवणूक

PMC: दुहेरी मोक्कातील आरोपीने केली पुणे महापालिकेची फसवणूक

पुणे : दुहेरी मोक्कातील आराेपी नाना गायकवाड याने बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून महापालिकेची फसवणूक केली. त्याने औंध येथील एका इमारतीचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भाडेकरार करून फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत इमारत निरीक्षक कामिनी सुरेश घोलप (३५, रा. जांभूळवाडी, कात्रज) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, हा प्रकार सर्व्हे नंबर १२७/१ ए ते १ इ, प्लॉट नंबर १०८ औंध या ठिकाणी १५ डिसेंबर २०२० पासून ३० ऑक्टोबरदरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नानासाहेब शंकरराव गायकवाड (रा. एनएसजी हाउस, बाणेर रोड) आणि भोगवटा प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी कामिनी घोलप या पुणे महापालिकेमध्ये इमारत निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे बिल्डर्स यांना बांधकामाची परवानगी देणे, बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देणे इत्यादी संबंधित कामे आहेत. आरोपी नानासाहेब गायकवाड याने बांधकाम केलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भोगवटा प्रमाणपत्र महापालिकेकडून घेतले नव्हते. तरीदेखील त्याचा वापर सुरू केला होता. तसेच त्याने इमारतीचा पहिला मजला स्टेट बँक ऑफ इंडियाला भाडे करारावर दिला होता.

भाडे करार करताना त्याने भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ते करारनाम्यात जोडले. नानासाहेब गायकवाड याने यात शासन आणि पुणे महापालिकेची फसवणूक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक झरेकर करीत आहेत. नानासाहेब गायकवाड याच्यावर यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. सोबतच जमीन बळकावणे, धमकावणे, खंडणी उकळणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर डबल मोक्का लावण्यात आलेला आहे.

Web Title: PMC: Accused in double-dealing cheated Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.