PMC: ११ हजार कोटींचे बजेट अन् सहा महिने झाले पालिकेच्या रुग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन नाही
By राजू हिंगे | Published: March 21, 2024 06:27 PM2024-03-21T18:27:51+5:302024-03-21T18:29:10+5:30
११ हजार कोटींचे बजेट अन् सहा महिने झाले पालिकेच्या रुग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन नाही...
पुणे : अकरा हजार कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या पुणे महापालिकेच्या रुग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन उपलब्ध नाही. गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून हे इंजेक्शनच आलेले नाहीत. शासन पुरवठा करत असलेले इंजेक्शन खरेदी करता येत नाही, असे कारण देत महापालिकेनेही या इंजेक्शनची खरेदीच केलेली नाही.
महापालिकेकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी शहरात दवाखाने तसेच रुग्णालये चालविली जातात. या ठिकाणी प्रामुख्याने कामगार तसेच कष्टकऱ्यांसाठी नाममात्र दरातील ही वैद्यकीय सेवा महत्त्वाची ठरते. राज्य शासनाकडून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अनेक इंजेक्शन तसेच औषधांचा पुरवठा महापालिकेस केला जातो. त्यात, घटसर्प तसेच धनुर्वाताचे एकत्रित इंज़ेक्शन पुरविले जाते. मात्र, शासनाकडून गेल्या सहा महिन्यांपासून अनेक औषधांचा नियमित पुरवठा होत नाही त्यात धनुर्वाताच्या इंजेक्शनचाही समावेश आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर म्हणाले की, महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी औषधे उपलब्ध असणे गरजेचे आहे, त्यामुळे महापालिकेने तातडीने सर्व रुग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत.