PMC | प्रशासकराजची वर्षपूर्ती, महापालिकेचा भांडवली खर्च केवळ ८०५ कोटींचा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:09 AM2023-03-15T11:09:05+5:302023-03-15T11:09:42+5:30
अनेक कामे कागदावरच
पुणे : महापालिकेच्या २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात विकासकामासाठी तीन हजार ७१० कोटी ४४ लाखांची भांडवली तरतूद केली होती; पण फेब्रुवारी २०२३ पर्यंत केवळ ८०५ कोटींचा भांडवली खर्च झाला आहे. त्यामुळे अनेक विकासकामे कागदावरच राहिली. महापालिकेला पाच हजार ७६२ कोटींचे उत्पन्न मिळाले असून, महसूली खर्च तीन हजार ५५८ कोटींचा झाला आहे.
पुणे महापालिकेतील नगरसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली. त्यानंतर पुणे महापालिकेत १५ मार्चपासून प्रशासकराज सुरू झाले. आयुक्त विक्रम कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही कारकिर्द सुरू झाली. महापालिकेचे २०२२-२३ चे बजेट आठ हजार ५९२ कोटींचे होते.
आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये उत्पन्नवाढीचा पर्याय आणि नवीन प्रकल्पाचा समावेश नव्हता. या बजेटमध्ये तीन हजार ७१० कोटी ४४ लाखांची विकासकामांसाठी भांडवली तरतूद केली. त्यापैकी २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत केवळ ८०५ कोटी भांडवली खर्च झाला आहे. त्यामुळे अनेक विकासकामे कागदावरच राहिली आहेत.
खाटांची क्षमता दोन हजार :
कोरोनाकाळात पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधेचे अक्षरश: वावडे निघाले. त्यावेळी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये फक्त एक किलो लिटर ऑक्सिजनचा प्लॅंट होता. आता महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत १४ ऑक्सिजन जनरेटर प्लॅंट बसविले आहेत. कोरोनापूर्वी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १,२०० खाटांची क्षमता होती. ती आता २,००० झाली आहे.
वर्गीकरणाद्वारे निधी वळविण्याचा धडाका
पुणे महापालिकेचे २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार यांनी तयार केले होते. सर्वसाधारण सभेची मुदत संपल्यामुळे आयुक्तांनी तयार केलेले बजेटच कायम राहिले. आयुक्त हेच प्रशासक म्हणून राहिले. त्यामुळे प्रशासकराजमध्ये आयुक्तांनी मंजूर केलेल्या बजेटची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची संधी होती. नगरसेवकांप्रमाणे या बजेटमधूनही मोठ्या प्रमाणात वर्गीकरण करण्यात आले. नगरसेवकांवर टीकेची झोड उठविणाऱ्या प्रशासनाने अनेक क्षुल्लक कामांसाठी वर्गीकरण करून निधी वळविण्याचा सपाटा लावला आहे.
उधळपट्टीला लगाम
महापालिकेच्या एका वर्षातील प्रशासक राजवटीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे नगरसेवकांकडून हाेणाऱ्या ‘स’ यादीतील निधीच्या कोट्यवधींच्या उधळपट्टीला लगाम लागला. लोकप्रतिनिधीच्या संकल्पनांच्या पाट्यापासून चौकाचौकांतील अनावश्यक शिल्प, सुशोभीकरण, पिशव्या, बकेट वाटपापर्यंतच्या अनावश्यक अशा अनेक कामांना ब्रेक लागला.
पुणे महापालिका जमा खर्च (२८ फेब्रुवारी २०२३)
उत्पन्न : पाच हजार ७६२ कोटी
महसुली खर्च : तीन हजार ५५८ कोटी
भांडवली खर्च : ८०५ कोटी