PMC Election| महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी २९ जुलै रोजी आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 02:03 PM2022-07-23T14:03:23+5:302022-07-23T14:04:56+5:30
सप्टेंबर अखेर निवडणुका होण्याची शक्यता...
पुणे : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यातील १३ महापालिकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी २९ जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे आरक्षण सोडत झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून सप्टेंबर अखेर निवडणुका होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेत प्रशासकराजची सहा महिन्यांची मुदत १४ सप्टेंबर रोजी संपत आहे. अशावेळी २२ जुलै रोजीच निवडणूक आयोगाने राज्यातील १३ महापालिकांना २९ जुलै रोजी ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. या सोडतीनंतर ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना मागवून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण तक्ता ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्याचे नमूद केले आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने २३ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी समाजातील महिला व खुल्या जागा तसेच सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली होती. पुणे महापालिकेत २३ जागा एस.सी. साठी रिझर्व्ह असून त्यापैकी १२ जागा या एससी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन जागा एसटी समाजासाठी राखीव आहेत. एससी व एसटी समाजासाठीचे आरक्षण २०११ च्या जनगणनेनुसार ठेवण्यात आल्याने मतदार यादीमध्ये बदल झाले तरी, यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीनुसारच त्या जागा आरक्षित राहणार आहेत. परंतु आता २७ टक्के ओबीसी आरक्षणामुळे पुणे महापालिकेमध्ये ४७ जागा या ओबीसी प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गासोबतच महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे.
महापालिका निवडणुकीचे चित्र
एकूण जागा -१७३
महिलांसाठी राखीव - ८७
एससी प्रवर्गासाठी राखीव -२३ (१२ महिला)
एसटी प्रवर्गासाठी राखीव - २ (१ महिला)
ओबीसी प्रवर्ग - ४७ (२४ महिला)
सर्वसाधारण महिला - ५०
सर्वसाधारण गट - ५१