PMC Election | मतदार यादीवर तब्बल चार हजार २७३ हरकती; प्रत्यक्ष पंचनामा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:11 PM2022-07-04T13:11:51+5:302022-07-04T13:12:26+5:30
क्षेत्रीय कार्यालयनिहाय हरकती पुढीलप्रमाणे...
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळेच की काय तब्बल चार हजार २७३ हरकती व सूचना महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकती व सूचनांची नोंद घेऊन महापालिका प्रभागनिहाय मतदार याद्या दुरुस्त करेल, अशी अपेक्षा आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. ३) दोन हजार ३६६ हरकती नोंदवल्या गेल्या. महापालिकेच्या निवडणुकीसाठी ५८ प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. २३ जून रोजी या प्रा-रूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या व ३० जूनपर्यंत या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली. परंतु, अनेक ठिकाणी प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात असण्याच्या तक्रारींचे प्रमाण मोठे होते. यामुळे ही मुदत तीन दिवसांनी वाढवून देण्यात आली होती. आता या हरकती व सूचनांचा विचार करून महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून अंतिम मतदार यादी जाहीर होणे आवश्यक आहे.
सर्वाधिक हरकती बिबवेवाडी येथे
महापालिका क्षेत्रीय कार्यालयातील सर्वांत जास्त हरकती या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाल्या असून, ही संख्या ८८६ इतकी आहे, तर कमी हरकती या औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असून ही संख्या ४२ इतकी आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय हरकती पुढीलप्रमाणे
* भवानी पेठ : ५७
* धनकवडी सहकारनगर : ५५२
* ढोले पाटील रोड : २७७
* हडपसर मुंढवा : १२०
* कसबा विश्रामबाग : ४९
* कोंढवा येवले वाडी : ४३८
* कोथरूड बावधन : २८०
* नगर रोड वडगाव शेरी : ३३३
* शिवजीरोड घोले रोड : ८९
* सिंहगड रोड : ५२४
* वानवडी रामटेकडी : १४३
* वारजे कर्वेनगर : ४२६
* येरवडा कळस धानोरी : ५७
प्रत्यक्ष पंचनामा होणार
मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. गरज असल्यास प्रत्यक्ष जागेवर जाऊन हरकतींचा पंचनामा केला जाणार असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.