PMC : मॅटर्निटीतही मिळणार आता जेनेरिक औषधे, रुग्णांची तब्बल ३० ते ६० टक्के हाेणार बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:34 AM2023-11-21T10:34:29+5:302023-11-21T10:35:39+5:30
या स्टाेअरसाठी नॅकॉफ इंडिया या संस्थेला जागा देण्यात येणार आहे....
पुणे : महापालिका येत्या दीड महिन्यात १९ प्रसूतिगृहांत (मॅटर्निटी) जेनेरिक औषधे स्टोअर सुरू करणार आहे. त्यामुळे नागरिकांना तब्बल ३० ते ६० टक्के स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत. या स्टाेअरसाठी नॅकॉफ इंडिया या संस्थेला जागा देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्याच्या विविध योजना राबवण्यात येतात. शहरी-गरीब योजनेच्या माध्यमातून अनेक आजारांवर उपचार करण्यात येतात. नागरिकांना या योजनेचा थेट फायदा होतो. मात्र असंसर्गिक आजारामधील उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही ठिकाणी तर एका घरात तीन ते चार रुग्ण आढळतात. काहींना अनुवांशिक मधुमेह असतो. त्यामुळे औषधांवरच त्यांचा मोठा खर्च होतो.
अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे असंसर्गिक रोगांवरील औषधे मोफत देण्यात येतात. याच धरतीवर पुणे महापालिकेनेसुद्धा आता उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांच्यावरील औषधे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या १९ मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) औषधे मोफत मिळत आहेत.
पालिकेने केल्या जागा निश्चित :
जेनेरिक औषधे स्टोअर सुरू करण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढले आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेकडून येत्या दीड महिन्यात १९ प्रसूतिगृहांत जेनेरिक औषधे स्टोअर सुरू करणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसारच हे स्टाेअर उघडण्यासाठी महापालिकेकडून नॅकॉफ इंडिया या संस्थेला जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने जागा निश्चित केल्या आहेत. या जागा भाडेकराराने दिली जाणार असल्याने त्याचे मूल्यांकन मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून करून घेतले आहेत. पालिकेचा आरोग्य विभाग लवकरच स्थायी समितीपुढे याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवणार आहे.
जेनेरिक औषधांचे फायदे काय?
- ब्रॅंडेड औषधांइतकीच गुणवत्ता जेनेरिक औषधांत असून, ब्रॅंडेड औषधांच्या तुलनेत किंमत ३० ते ६० टक्के कमी आहे. त्यामुळे पैशांची बचत हाेते. औषधांची गुणवत्ता, परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल गैरसमज असल्याने आणि औषधांचे फार मार्केटिंग केले जात नसल्याने मागणी कमी आहे; पण जेनेरिक औषधे रंग, आकार किंवा पॅकेजिंग यांसारख्या स्वरूपात भिन्न असले तरी गुणवत्ता कुठेच कमी नसते, असे तज्ज्ञ सांगतात. ब्रॅंडिंगचा माेठा खर्च टळल्याने ही औषधे स्वस्तात उपलब्ध हाेतात.
बदलती जीवन शैली, कोरोना संसर्गानंतर तरुणांमध्ये वाढलेले उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) आजाराचे प्रमाण पाहता महापालिका या दोन आजारावरील जनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार आहे. आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत महापालिकेचे ५५ दवाखान्यात बीपी आणि शुगरची औषधे मोफत दिली जाणार आहेत. १९ प्रसूतिगृहांत (मॅटर्निटी) येत्या दीड महिन्यात जेनेरिक औषधे स्टोअर सुरू करणार आहे.
- डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका