PMC: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! थकबाकी नसलेल्यांनी भरावे चालू वर्षाचे बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:27 PM2023-06-10T12:27:54+5:302023-06-10T12:28:45+5:30

महापालिकेने ४० टक्के मिळकत कर सवलत पूर्ववत सुरू केली आहे....

PMC Important news for Pune residents Current year bill should be paid by those who do not have dues | PMC: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! थकबाकी नसलेल्यांनी भरावे चालू वर्षाचे बिल

PMC: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! थकबाकी नसलेल्यांनी भरावे चालू वर्षाचे बिल

googlenewsNext

पुणे : शहरातील निवासी मिळकतीच्या करात ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतरही मिळकत कर बिलात जादा थकबाकी दर्शविली असल्याने पुणेकर चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने स्वत: राहत असलेल्या आणि मागील थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांनी केवळ चालू वर्षीचे (२०२३-२४) बिल भरावे. सोबतच पीटी ३ फॉर्म भरून द्यावा, जेणेकरून बिलांमध्ये दिसणारी थकबाकी दिसणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

महापालिकेने ४० टक्के मिळकत कर सवलत पूर्ववत सुरू केली आहे. प्रत्यक्षात बिल हातात पडल्यानंतर ज्यांनी मागील वर्षीपर्यंतचा कर भरला असतानाही मागील चार वर्षांचे ४० टक्क्यांनी एरिअस बिलांमध्ये दिसत आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्यानंतर कर आकारणी विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी कर विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

२०१९ पूर्वीच्या मिळकतधारकांना पीटी ३ फॉर्म भरणे आवश्यक नाही. कर आकारणी १ एप्रिल २०१९ पूर्वीची असल्यास अशा निवासी मिळकतधारकांना पूर्वीप्रमाणेच ४० टक्के सवलत कायम आहे. त्या निवासी मिळकतधारकांनी पीटी ३ फॉर्म भरणे आवश्यक नाही. सर्व मिळकतींच्या देखभाल दुरुस्तीपोटीची वजावट १५ टक्क्यांवरून १० टक्के केली आहे. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत बिलांमध्ये काहीशी वाढ झाली आहे. कर आकारणी १ एप्रिल २०१९ नंतरची असल्यास निवासी मिळकतींना २३-२४ च्या करपात्र रकमेत ४० टक्के सवलत दिली आहे. मिळकतीत स्वतः राहत असल्यास मिळकतकराची फक्त चालू मागणीची रक्कम भरावी. मिळकतीत स्वतः राहत असल्यासच थकबाकीची रक्कम भरू नये.

अतिरिक्त रक्कम करणार चार समान हप्त्यांत वळती :

महापालिकेने केलेल्या जीआयएस सर्वेक्षणानुसार काही मिळकतींची ४० टक्के सवलत रद्द झाली आहे. अशा मिळकतींना पूर्वीच्या थकबाकीची देयके पाठविली आहेत. पण, या मिळकतींनाही १ एप्रिल २३ पासून करपात्र रकमेत ४० टक्के सवलत लागू आहे. त्यांनी स्वतःच्या राहत्या सदनिकेसाठी पीटी ३ फॉर्म भरणे आवश्यक आहे. संपूर्ण कर भरला असल्यास अतिरिक्त रकमेची चार समान हप्त्यांत वजावट केली जाणार आहे. ही रक्कम चार वर्षांच्या मिळकतकर देयकातून वळती केली जाणार आहे.

केवळ दोनच कागदपत्रे लागणार :

मिळकत कर सवलतीसाठी पीटी ३ फॉर्म महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्रांमध्ये तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. या फॉर्मसोबत रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, सोसायटीचे ना हरकत पत्र यापैकी कुठलीही दोन कागदपत्रे लागणार आहेत. पीटी ३ फॉर्मसोबत सोसायटीच्या चेअरमनचे पत्र बंधनकारक नाही. त्यासाठी अडवणूक करू नये. ज्यांच्या नावे शहरात दोन मिळकती आहेत, त्यांनी दुसऱ्या मिळकतीची कर पावती जोडावी. १५ नोव्हेंबरपर्यंत पीटी ३ फॉर्म आवश्यक पुराव्यांसह भरून द्यावा.

Web Title: PMC Important news for Pune residents Current year bill should be paid by those who do not have dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.