PMC: महापौर, आयुक्त, कलेक्टर बंगला येथे अद्यापही पाणी मीटर नाही
By राजू हिंगे | Published: October 25, 2023 01:03 PM2023-10-25T13:03:53+5:302023-10-25T13:06:14+5:30
पुणेकर पाण्याचा अति वापर करतात हा आरोप सातत्याने केला जातो या पार्श्वभूमीवर ही पाणी मीटरची योजना राबवली जात आहे...
पुणे : पुणे महापालिका समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी मीटर बसवत आहे. महापौर बंगला , महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो. त्यामुळे या ठिकाणी अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. त्यामुळे शहरातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाणीमीटर बसवतील आणि त्यांचा पाणीवापर किती आहे हे दरमहा जाहीर करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.
पुणेकर पाण्याचा अति वापर करतात हा आरोप सातत्याने केला जातो या पार्श्वभूमीवर ही पाणी मीटरची योजना राबवली जात आहे. बसवलेल्या मीटर्सपैकी ज्या नागरिकांचा पाणीवापर दरडोई दर दिवशी १५० लिटर पेक्षा जास्त होत आहे त्यांना कायदेशीर कारवाईच्या धमक्या देणाऱ्या नोटीसा ही पाठवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या सर्व ठिकाणी दरडोई दर दिवशी किती पाणीवापर होतो याची माहिती घेतली. त्यावेळी महापालिकेच्या कोणत्याही प्राॅपर्टी मधे अजून पाणी मीटर्स बसवले नसल्याचे सांगण्यात आले होते.
त्यावेळी या ठिकाणी लवकरच पाणी मीटर बसवू असे सांगितले होते. पण अदयापही महापौर बंगला , महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी पाणी मीटर बसविले नाहीत. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत असा आरोप विवेक वेलणकर यांनी केला आहे.