PMC: जाहिरात लावा, बदल्यात स्वच्छतागृह दुरुस्त करा! पालिकेची नवी आयडिया
By राजू हिंगे | Published: November 9, 2023 02:28 PM2023-11-09T14:28:34+5:302023-11-09T14:29:36+5:30
या बदल्यात संबधितांला चारही स्वच्छतागृहांवर मिळून ९०० चौ. फुट जागा जाहिरातीच्या होर्डींगसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे....
पुणे : शहरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्थीत देखभाल व्हावी यासाठी पालिकेने प्रथमच जाहिरात हक्काच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्तीची निविदा काढली आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा, खराडी आणि एअरपोर्ट रोडवरील चार स्वच्छतागृहांसाठी निविदा काढण्यात आली आहे. या बदल्यात संबधितांला चारही स्वच्छतागृहांवर मिळून ९०० चौ. फुट जागा जाहिरातीच्या होर्डींगसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महापालिकेच्यावतीने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली आहे. या स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्तीची कामे ठेकेदारांच्या मार्फतीने केली जातात. यासाठी महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. आता मात्र पालिकेने खर्चामध्ये बचत करण्यासाठी जाहिरात हक्काच्या बदल्यात स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्तीची संकल्पना पुढे आणली आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावरील सुरूवात येरवडा येथील दोन, खराडी आणि एअरपोर्ट रोडवरील वर्दळीच्या रस्त्यांवरील स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे.
या बदल्यात संबधितांला चारही स्वच्छतागृहांवर मिळून ९०० चौ. फुट क्षेत्र जाहिरातीच्या होर्डींगसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पहिले सहा महिने या स्वच्छतागृहांची डागडुजी आणि सुशोभीकरणासाठी असतील. यानंतर पुढील १० वर्षे संबधित निविदाधारकाने स्वच्छतागृहांची देखभाल दुरूस्ती करायची आहे.