PMC: पुणे महापालिकेचे सहा दवाखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आराखडा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 09:44 AM2023-09-04T09:44:55+5:302023-09-04T09:45:16+5:30

सहा रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची सद्य:स्थिती, रुग्णालयांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे...

PMC: Plan ready to run six hospitals of Pune Municipal Corporation at full capacity | PMC: पुणे महापालिकेचे सहा दवाखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आराखडा तयार

PMC: पुणे महापालिकेचे सहा दवाखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आराखडा तयार

googlenewsNext

पुणे :पुणे महापालिकेचे मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, भवानी पेठेतील सोनावणे रुग्णालय, सिंहगड रस्त्यावरील लायगुडे हॉस्पिटल, शिवाजीनगरमधील दळवी हॉस्पिटल, हडपसरमधील मगर हॉस्पिटल, येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलचा या सहा रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची सद्य:स्थिती, रुग्णालयांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून या रुग्णालयांतून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन ती पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे ५७ ओपीडी आणि १९ प्रसूतिगृहे आहेत. या प्रसूतीसह, इतर वैद्यकीय उपचारांसाठीची बेडची क्षमता असतानाही केवळ प्रसूतीची सुविधा या रुग्णालयांमध्ये मिळते. तर कमला नेहरू रुग्णालयासह, इतर काही रुग्णालयांत काही संयुक्त प्रकल्पात हृदयरोग, डोळे तसेच डायलेसिस तसेच दातांचे उपचार केले जातात. त्या व्यतिरिक्त इतर उपचारांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे, महापालिकेने काही प्रमुख रुग्णालयांची बेडची संख्या पूर्ण क्षमतेने निर्माण करून त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, तसेच प्रशिक्षित कर्मचारी यांचा नेमका आकडा निश्चित केला आहे. त्यानुसार, महापालिकेकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ तसेच विद्यार्थी तसेच गरज भासल्यास कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार आहे. या शिवाय, आजारांच्या निदानासाठी वैद्यकीय सामग्रीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय सेवेसाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेत सीएसआरअंतर्गत निधी देण्याची तयारी दर्शविली असून, या निधीतून हे दवाखाने सुसज्ज केले जाणार आहेत. या सर्व दवाखान्यांसाठी मोठ्या इमारती, १०० हून अधिक बेडची सुविधा असली तरी अपुरे मनुष्यबळ तसेच सुविधांचा अभाव असल्याने हे दवाखाने अतिशय कमी क्षमतेने तसेच केवळ प्रसूतिगृहे म्हणून चालविली जातात. परिणामी, इतर आजारांच्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.

Web Title: PMC: Plan ready to run six hospitals of Pune Municipal Corporation at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.