PMC: पुणे महापालिका शहरात आणखीन दोन हेरिटेज वॉक सुरू करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:59 PM2023-06-27T20:59:15+5:302023-06-27T21:00:01+5:30
महापालिकेचा सध्या शनिवारवाडा परिसरात हेरिटेज वॉक आहे...
पुणे :पुणे महापालिका शनिवारवाडा परिसर हेरिटेज वॉक नंतर आता दोन हेरिटेज वाॅक सुरू करणार आहे. त्यात सिंहगड, शिवसृष्टी व इस्कॉन मंदिर तर दुसरा आगाखान पॅलेस आणि डेक्कन कॉलेज या परिसर याचा समावेश आहे. हे हेरिटेज वॉक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
महापालिकेचा सध्या शनिवारवाडा परिसरात हेरिटेज वॉक आहे. यामध्ये या परिसरातील लाल महाल, विश्रामबागवाड्यासह ११ वास्तूंची माहिती दिली जाते. एका खासगी संस्थेचे तज्ज्ञ सहभागींना मार्गदर्शन करतात. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी हेरिटेज वॉकचा आढावा घेतला. त्यात आणखी दोन हेरिटेज वॉक सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
शनिवारवाडा परिसरातील हेरिटेज वॉकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेच्या बैठकीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनीही या हेरिटेज वॉकमध्ये सहभाग घेतला होता. प्रायोगिक स्वरूपात सिंहगड किल्ला, आंबेगाव येथील शिवसृष्टी आणि इस्कॉन मंदिर असा एक हेरिटेज वॉक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच आगाखान पॅलेस आणि डेक्कन कॉलेज येथे आणखी एक हेरिटेज वॉक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सिंहगड किल्ल्यावर फिरल्यानंतर तेथेच नाश्ता करून आंबेगावमध्ये शिवकाल अनुभवण्याची संधी मिळेल तर तेथून इस्कॉन मंदिराचे दर्शन व भोजन असा प्रस्ताव आहे. तर महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांचा निवास असलेली आगाखान पॅलेसची देखणी वास्तू पाहून डेक्कन कॉलेजमधील संग्रहालय, ग्रंथालयाची पाहणी पर्यटकांना करता येईल, असे ढाकणे यांनी सांगितले.