Pune Water News: गप्पा २४ तास पाणीपुरवठ्याच्या पण शहरात आजही १५ हजार टँकर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:15 PM2022-01-11T15:15:19+5:302022-01-11T15:15:28+5:30
उन्हाळ्याची चाहूल सुरू झाल्यावर टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती आहे
नीलेश राऊत
पुणे : पुणे महापालिका शहरातील सर्व नागरिकांना २४ तास पाणी पुरविण्याच्या गप्पा मारत आहेत. मात्र, आजही पुण्यात १५ हजारांवर टँकर सुरू आहेत. नोव्हेंबर महिन्यात १५ हजार ३५६ टँकर लागले होते. उन्हाळ्याची चाहूल सुरू झाल्यावर टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती आहे.
पुणे महापालिकेतील सगळेच नगरसेवक आपल्या अहवालांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी काय केले सांगतात. वाहिन्या बदलण्यापासून ते टाक्या बसविल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात अनेक भागांत पुरेसे पाणी पोहोच नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागते.
मे महिन्यापासून दरमहा शहराला २५ हजार टँकरची गरज पडत आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा दहा हजारांनी कमी झाला, तरी नोव्हेंबर महिन्यात शहरात १५ हजार ३५६ टँकर लागले असून, ते गेल्या सहा महिन्यांची तुलना करता दहा हजारांनी कमी झाले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये महिनाभरात महापालिकेद्वारे १ हजार ६५२, ठेकेदाराद्वारे १२ हजार ४८९ व चलन करून १ हजार २१५ असे एकूण एकूण १५ हजार ३५६ टँकर शहराच्या विविध भागांत पोहोचविले आहेत. यामध्ये सर्वाधिक टँकर हे रामटेकडी येथील टँकर पॉइंटवरून गेले. येथे महापालिकेचे ९४३, ठेकेदाराचे १२ हजार ४८९ तर चलनद्वारे १ हजार २१५ टँकरद्वारे पाणी भरले गेले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात यावर्षी मुबलक पाऊस झाला. तरीही दर महिन्याला शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी साधारणत: २४ ते २७ हजार टँकर लागत आहेत. एकीकडे अडीच हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेमध्ये पाचशे कोटी रुपये खर्च करून मीटर्स बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण याचवेळी ज्या ठिकाणी नळांना पाणीच नाही तेथे अखेर टँकरचाच सहारा घ्यावा लागत आहे. पावसाळ्यात मुबलक पाऊस होऊनही शहरातील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा करणारी महापालिका किमान पाणीपुरवठा न होणाऱ्या भागाला पिण्यायोग्य पाणी तरी पोहोचविणार का, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
चतुश्रुंगी टँकर पाॅइंटवरून बाणेर, बालेवाडी, पाषाण आदी भागाला पाणीपुरवठा
शहरात रामटेकडी येथील टँकर पॉइंटवर शहरातील ४० ते ४५ टक्के टँकर भरले जात आहेत़ येथून देवाची उरळी, फुरुसुंगी, शेवाळवाडी येथे दररोज सुमारे २०० टँकर पिण्याचे पाणी पोहोचवित आहेत़ रामटेकडीपाठापोठ स्वारगेट येथून आंबेगाव कोंढवा आदी उंच भागातील परिसरात की जेथे पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो तेथे टँकरचे प्रमाण अधिक आहे़ तर यापाठोपाठ चतुश्रुंगी टँकर पाॅइंटवरून बाणेर, बालेवाडी, पाषाण आदी भागाला पाणीपुरवठा होत आहे.
''महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची देवाची उरळी, फुरुसुंगी भागाला पाणीपुरवठा करणारी योजनेचे ५० टक्के काम फेब्रुवारी, २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून, याकरिता आवश्यक निधी महापालिकेने मंजूर केला आहे. २०२२ अखेर येथील प्राधिकरणाची योजना पूर्ण झाल्यावर येथे टँकरची गरज भासणार नाही असे मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.''
गेल्या सहा महिन्यातील टँकरची संख्या
मे २०२१ : टँकर संख्या २७ हजार ४१९
जून २०२१ : टँकर संख्या २४ हजार २५१
जुलै २०२१ : टँकर संख्या २४ हजार ८६४
ऑगस्ट, २०२१ : टँकर संख्या २४ हजार १३६
सप्टेंबर २०२१ : टँकर संख्या २४ हजार ३४५
ऑक्टोबर २०२१ : टँकर संख्या २५ हजार ५७५
नोव्हेंबर २०२१ : टँकर संख्या १५ हजार ३५६