.....जेव्हा महापालिका सभागृह गहिवरते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 10:06 PM2018-09-17T22:06:37+5:302018-09-17T22:08:22+5:30
जुन्या इमारतींमधील या सभागृहात काम केलेल्या अनेकांनी थेट केंद्रातील सरकारमध्ये मंत्री होण्यापासून ते खासदार, आमदार, राज्यात मंत्री होण्यासारखी अनेक पदे भुषवली.
पुणे : सलग ६० वर्षांच्या विविध आठवणींचा पट ऊलगडत नगरसेवकांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला निरोप दिला. सन १९५८ मध्ये या सभागृहाचे उदघाटन झाले. आता मंगळवारच्या (दि. १८) सभेपासून सर्व नगरसेवक महापालिकेच्या विस्तारीत इमारतीमधील नव्या अत्याधुनिक सभागृहात बसतील. पदाधिकाऱ्यांची दालनेही त्याच इमारतीमध्ये असून जुन्या सभागृहाचा चांगला वापर करण्याचा शब्द महापौर मुक्ता टिळक यांनी त्यासाठी आग्रही असलेल्या नगरसेवकांना दिला.
जुन्या इमारतींमधील या सभागृहात काम केलेल्या अनेकांनी थेट केंद्रातील सरकारमध्ये मंत्री होण्यापासून ते खासदार, आमदार, राज्यात मंत्री होण्यासारखी अनेक पदे भुषवली. देशाच्या राजकारणात स्वत:चे नाव केले. मोहन धारिया यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापर्यंत अनेकांची नावे यावेळी सदस्यांनी घेतली. त्यामुळेच या सभागृहाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त म्हणून काम केलेल्या अनेकांच्या आठवणीही यावेळी सदस्यांनी सांगितल्या. राजकीय अडवाअडवी, जिरवाजीरवी, प्रशासनावर कुरघोडी, प्रशासनाचा डाव, नव्या सदस्यांना अडचणीत आणून प्रशिक्षण देणे, वर्चस्व गाजवणाऱ्यांना पुढच्या निवडणूकीत संधीच न मिळणे, अपेक्षा नसतानाही महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यासारखी पदे मिळणे, अशा अनेक आठवणींनी सभागृह मंगळवारी हरखून गेले. या सभागृहाने बरेच शहाणपण दिले व अनेक गोष्टी लक्षातही आणून दिल्या, उतू नये मातू नये घेतला वसा टाकून नये हा धडा सभागृहानेच अनेक सदस्यांना दिला असे अनेक सदस्यांनी सांगितले.
चेतन तुपे म्हणाले, ‘‘अंदाजपत्रकावरील पहिल्याच भाषणाते कौतूक झाले व पुढे दीड वर्षे हात वर करूनही कधी बोलण्याची संधीच मिळाली नाही.’’ अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘राजकीय प्रशिक्षण या सभागृहातूनच मिळाले. नीला कदम, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांचे भाषण ऐकून यांच्यासारखे आपल्याला बोलायला यायला हवे असे वाटायचे.’’ वसंत मोरे यांनी सभागृहात यायचे असा पणच केला होता व तो यशस्वी झाला असे सांगितले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी समाजातील उपेक्षीत वंचित घटकांकडे सभागृहाने नेहमीच आस्थेने पाहिले असे स्पष्ट केले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सभागृहात आल्यावर मी पणाची भावना कमी होऊन आपण केले, आम्ही केले ची भावना वाढीला लागते असे मत व्यक्त केले. नव्या सभागृहातही याचपद्धतीने खेळीमेळीने काम होईल असे ते म्हणाले.महापौर टिळक म्हणाल्या, या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली ही मोठीत गोष्ट आहे. राजकारण तसेच समाजकारणातील अनेक गोष्टी या सभागृहाने शिकवल्या. त्याचा कायमच उपयोग होईल. सदस्यांना वाटते तसे हे सभागृह मोडणार, तोडणार नाही तर त्याचा विधायक कामासाठी वापर केला जाईल. या सभागृहाचे वैभव जपले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रगीत गायनाने नेहमीप्रमाणे या सभागृहातील या अखेरच्या सभेचे कामकाज संपवण्यात आले. गोपाळ चिंतल, दिलीप बराटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, अविनाश साळवे, अजित दरेकर, भैय्या जाधव, योगेश ससाणे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी,अजय खेडेकर या सदस्यांनी आपल्या नव्याजुन्या आठवणींना उजाळा दिला.