PMC: "प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करा..." पालिकेच्या सहा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस
By राजू हिंगे | Published: November 23, 2023 11:03 AM2023-11-23T11:03:37+5:302023-11-23T11:04:21+5:30
विविध बांधकामाच्या साईटवर पाहणी करून सहा बांधकाम व्यावसायिकांना उपाययोजना न केल्याने काम का थांबवू नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत....
पुणे : शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परिणामी, देशातील प्रदूषित शहरात पुणे गणले जात आहे. याची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेने ठाेस पाऊल उचलली आहे. शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यामध्ये बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध बांधकामाच्या साईटवर पाहणी करून सहा बांधकाम व्यावसायिकांना उपाययोजना न केल्याने काम का थांबवू नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शहरात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये बांधकामांना त्यांच्या साईटवरून उत्सर्जित होणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा समावेश आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने बांधकाम विभागाच्या सेवकांद्वारे विविध बांधकामांच्या साईटवर पाहणी करण्याचे काम सुरू केले.
पाहणीत आढळल्या पुढील त्रुटी
सहा बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याची स्प्रिंकल सिस्टिम यंत्रणा न बसवणे, बांधकामाच्या साईटवर सर्व बाजूंनी पत्र लावणे, जागेवर राडाराेडा धूळ बाहेर जाऊ नये यासाठी पाण्याची स्प्रिंकल सिस्टिम यंत्रणा न बसवणे, बांधकाम जागेवर ग्रीन नेट न बसविणे या उपाययोजना न केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे, असे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे माधव जगताप यांनी सांगितले.
यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई मग पाण्याचे स्प्रिंगल सिस्टिम वापरा
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मुख्य रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी मेकॅनिकल स्टेट्स सुपर मशीनचा वापर वाढविण्यात येणार आहे. त्याचवेळी पाण्याचे स्प्रिंगल सिस्टिम वापरण्याबद्दल आदेश दिले आहेत. पुणे महा मेट्रो यांच्यामार्फत चालू असलेल्या बांधकामाच्या साईटवर उत्सर्जित होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी महा मेट्रोमार्फत विशेष पथक नेमण्यात आले. ज्या ठिकाणी बांधकाम साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग होते अशा ठिकाणी पाण्याचे स्प्रिंगल सिस्टिम बसविण्यात आले आहे. बांधकामाच्या चहूबाजूंनी बॅरिकेटिंग आणि ग्रीन नेट बसवण्यात आले आहेत. उघड्यावर कचरा जाळणे आणि राडाराेडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पथकात यांचा आहे समावेश
उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता/बीट निरीक्षक एम.एस.एफ. जवान यांची या पथकात नेमणूक करण्याचा उल्लेख शासनाच्या आदेशात आहे.