पुण्यात रस्त्यावर थुंकणं नागरिकांना पडतंय महागात ; पालिकेची जाेरदार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:39 PM2018-11-12T20:39:28+5:302018-11-12T20:42:24+5:30
स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेने अखेर थुंकी बहाद्दरांवर दंडात्मक कारवाई करुन पुणेकरांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे.
पुणे : स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेने अखेर थुंकी बहाद्दरांवर दंडात्मक कारवाई करुन पुणेकरांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे. शहरातील एकूण 41 प्रभागांमधून 397 जणांकडून 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छतेचा पुरस्कार, थुंकण्यांवर बंदी आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई आदी उपक्रम पालिकेने हाती घेतले आहेत.
शहरात सकाळपासूनच पालिकेच्या अधिका-यांकडून दोषींवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. यात पान, तंबाखू, गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणा-यांवर गांधीगिरीच्या मार्गाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापक ज्ञानेश्वर मोळक यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तसेच प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी हजेरी कोठी व कोथरूड गावठाण हजेरी कोठी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आरोग्य कोठी अंतर्गत डहाणूकर कॉलनी सर्कल, शिराळकर चौक, कर्वे पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, भेलके नगर चौक येथे आरोग्य निरिक्षक शिवाजी गायकवाड, सचिन लोहकरे,प्रमोद चव्हाण मोकादम वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे यांनी गांधीगिरीतून थुंकी बहाद्दरांना गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे नागरिकांचा सत्कार करून सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करू नका अशी विनंती करण्यात आली.
कारवाई करत असताना काही नागरिकांनी दंड भरण्यास आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून रिकामे पाकीटे काढून दाखवत होते. अशा व्यक्तींना पाण्याने रस्ते धुवून स्वच्छ करून घेतले. तर काही नागरिकांनी पालिकेच्या कारवाईचे कौतुक करीत त्यात सातत्य दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. तर काही नागरिकांनी दंड करत असताना अधिका-यांशी हुज्जत घातल्याचे दिसून आले. वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांनी स्वत: स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व वाद घालणा-या नागरिकांना पटवून दिल्यानंतर शिवाय ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल असेही सांगण्यात आले. रस्ता अस्वच्छ करणा-यांकडून पाणी टाकून रस्ते स्वच्छ करून घेण्यात आले.
प्रभाग क्र 2 मध्ये उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी मोळक यांच्यासह संपूर्ण प्रभागाची दुचाकीवरुन पाहणी केली. याबरोबरच शहरातील अन्य प्रभागांमध्ये मुख्य लेखा परिक्षक अंबरीश गालिंदे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, श्रीनिवास कंदुल, उपआयुक्त जयंत भोसेकर, तुषार दौंडकर अनिल मुळे, वैभव कडलक, अरुण खिलारे आणि गणेश सोनुने यांनी नेमुन दिलेल्या प्रभागांमध्ये पाहणी केली. एकूण 700 अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मदतीने पुढील तीन महिन्यांकरिता 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.