पुणेकरांनो, घरातील प्लॅस्टिक कचरा महापालिका घेणार, येत्या रविवारी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:43 PM2018-05-03T19:43:13+5:302018-05-03T19:43:13+5:30
राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगामी रविवार अर्थात ६ मे रोजी पुणे महापालिकेने प्लॅस्टिक व ई-कचरा संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.
पुणे : राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगामी रविवार अर्थात ६ मे रोजी पुणे महापालिकेने प्लॅस्टिक व ई-कचरा संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
शासनाच्या राजपत्रानुसार प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणार्या पिशव्या, ताट, कप, प्लेट, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रोपीलेन बॅग्ज, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक पाऊच, कप, सर्वप्रकारचे अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक वेष्टन इत्यादींचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री , आयात व वाहतूक करण्यास राज्यात बंदी जाहीर करण्यात आली आहे.
प्लॅस्टिक बंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका प्लॅस्टिक कचरा स्वीकारणार आहे. रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांअंतर्गत १९३ ठिकाणी प्लॅस्टिक, थर्माकोल आणि ई-कचरा संकलन करण्यासाठी केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवरून प्लॅस्टिक संकलन करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रविवारी सकाळी आठ वाजता महात्मा फुले मंडईत या कार्यक‘माचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत उपस्थितांना शपथ देण्यात येणार आहे. त्यानंतर प्लॅस्टिक संकलन मोहिमेला प्रारंभ होईल.या पत्रकार परिषदेसाठी स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, घनकचरा विभाग प्रमुख उपायुक्त सुरेश जगताप उपस्थित होते.