पीेएमपीएमएल-प्रसन्न पर्पल करार रद्द; कोथरुडमधील चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:36 PM2017-11-21T12:36:50+5:302017-11-22T01:06:58+5:30

पीएमपीएमएलच्या खासगी बसचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पसन्न पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे.

PMMPML-Purple Agreement Canceled | पीेएमपीएमएल-प्रसन्न पर्पल करार रद्द; कोथरुडमधील चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

पीेएमपीएमएल-प्रसन्न पर्पल करार रद्द; कोथरुडमधील चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

Next
ठळक मुद्देप्रसन्न पर्पल कराराचे पालन करीत नाही, यामुळेच मागील २ महिन्यांपासून चालकांचे पगार नाहीत२०० पीएमपी बसेसचे चालक संपावर; प्रवाशांना मनस्ताप

पुणे : मार्गावर अपेक्षित बस न आणल्याबद्दल वारंवार नोटीस बजावूनही सेवेत सुधारणा न करणे तसेच चालकांनी अचानक संप करून प्रवाशांना वेठीस धरल्याने कराराचा भंग झाल्याच्या कारणास्तव पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स या कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे. या कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या २०० बस ताब्यात घेतल्या असून, बुधवारपासून ‘पीएमपी’कडून या बस मार्गावर आणल्या जाणार आहेत.
‘प्रसन्न पर्पल’ कंपनीकडील चालकांनी मंगळवारी सकाळी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे कोथरूड व पिंपरीतील नेहरूनगर आगारातून सुटणाºया सुमारे १६० बसचे वेळापत्रक काही प्रमाणात कोलमडून गेले. परिणामी सकाळच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यानंतर ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सकाळी तातडीने बैठक घेऊन संप केल्याच्या कारणास्तव कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्याकडील २०० बसही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या बस ताब्यात घेताना कुंबरे पार्क येथे कंपनीकडून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने बस ताब्यात घ्याव्या लागल्या. या बसची मंगळवारी दिवसभर तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारपासून या बस मार्गावर सोडल्या जातील, अशी माहिती मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
करारानुसार प्रसन्न कंपनीने दररोज किमान ८५ टक्के म्हणजे १७० बस मार्गावर आणणे अपेक्षित होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून एकदाही १७० बस मार्गावर आल्या नाहीत. पदभार स्वीकारल्यानंतर १९ एप्रिल रोजी कंपनीला करार रद्द करण्याबाबत नोटीसही देण्यात आली होती. त्यानंतर दोनदा कारणे दाखवा नोटीसही बजावली. परंतु, एकदाही १७० पर्यंत बस मार्गावर येऊ शकल्या नाहीत. दरम्यानच्या काळात चालकांनी अचानक संपही पुकारला होता. सातत्याने संधी देऊनही कराराचा भंग होत असल्याने त्यांना दंडही आकारण्यात आला.
मात्र, मंगळवारी पुन्हा चालकांनी अचानक संप पुकारला. अपेक्षित बस मार्गावर न आणून मागील आठ महिन्यांचा काळात कंपनीने ‘पीएमपी’चे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच ‘आयटीएमएस’ यंत्रणेचेही जाणीवपूर्वक नुकसान केले जात होते. या सर्व कारणांमुळे अखेर करार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. तसेच पीएमपीकडे काही कोटी रुपये थकीत असल्याचा ‘प्रसन्न’चा दावाही मुंढे यांनी फेटाळून लावला. उलट पीएमपीलाच त्यांच्याकडून येणे असल्याचे मुंढे म्हणाले.
पीएमपीने २०० बस ताब्यात घेतल्या असून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. करारानुसार कंपनीने पीएमपी सर्व बसेस सुस्थितीत परत करणे आवश्यक आहे. त्यानुसार बसेसची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये बसेसचे नुकसान झाल्याचे आढळल्यास ‘प्रसन्न’कडून त्या रकमेची वसुली केली जाईल. तसेच त्यांची बँक गॅरंटीही सील करण्यात आली आहे, असे मुंढे यांनी सांगितले.
पीएमपीकडून मागील दोन-तीन महिन्यांचे पैसे मिळाले नाही. सुमारे १० कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे चालकांचे वेतन देता आले नाही. पैशांची जुळवाजुळव करून त्यांना पैसे जात होते. पण आता चालक थांबायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे. पीएमपीने आतापर्यंत अनेकदा विविध कारणे दाखवून दंडाच्या स्वरूपात पैसे घेतले आहे. त्यामुळे आम्हाला करारातून मुक्त करावे, असे पत्र सोमवारी संचालक मंडळाला दिले होते. पण त्यांनी विश्वासात न घेता बेकायदेशीर पद्धतीने करार रद्द केला आहे. आमची पत खराब व्हावी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हे पाऊल उचलले आहे.
- प्रसन्न पटवर्धन, प्रमुख, प्रसन्न ट्रॅव्हल्स
>काय होता करार?
‘पीएमपी’ला काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सुमारे ५०० बस मिळाल्या होत्या. यापैकी २०० बस ‘पीपीपी’ तत्त्वावर प्रसन्न पर्पलला देण्यात आल्या होत्या. याबाबत १३ फेब्रुवारी २०१२ रोजी करार करण्यात आला होता. या कराराची मुदत दहा वर्षांची होती. या करारानुसार कंपनीने प्रवाशांना चांगली सुविधा देणे, सुमारे ८५ टक्के बस मार्गावर सोडण्याची अट घालण्यात आली होती.
सेवेवर परिणाम नाही : ‘प्रसन्न’कडील चालकांनी मंगळवारी अचानक केलेल्या संपाचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. या बस केवळ कोथरूड व पिंपरीमध्ये होत्या. नियमित बसच्या तुलनेत केवळ ५० बस मार्गावर कमी होत्या. त्यामुळे केवळ काही मार्गांवर प्रवाशांची गैरसोय झाली. बुधवारी ही स्थिती पूर्ववत होईल. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंढे यांनी केले.

Web Title: PMMPML-Purple Agreement Canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.